मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आदित्य धर यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट द इमॉर्टल अश्वत्थामा याच्या शुटिंगमध्ये आजवर असंख्य अडथळे आले. सुरुवातीला २०१९ मध्ये विकी कौशलला घेऊन हा सिनेमा बनवण्याची तयारी त्याने सुरू केली होती. पण त्यादरम्यान कोविडमुळे हा प्रकल्प रखडला. त्यानंतर सर्व काही पूर्ववत सुरू झाले व स्टुडिओतून लाईट्स, कॅमेरा, अॅक्शनचे आवाज होऊ लागले. मग पुन्हा एकदा आदित्य धर यांनी द इमॉर्टल अश्वत्थामासाठी मुख्य नायक म्हणून रणवीर सिंगला घ्यायची तयारी केली. पण हे वर्कआऊट होऊ शकलेले दिसत नाही. आता हा चित्रपट मोठ्या स्टारला घेऊन बनवायचे त्याने निश्चित केले आहे.
अल्लु अर्जुनशी संपर्क - विकी आणि रणवीरनंतर, द इमॉर्टल अश्वत्थामा निर्मात्यांनी मुख्य भूमिका साकारण्यासाठी पुष्पा स्टार अल्लू अर्जुनशी संपर्क साधला आहे. वेबलॉइडच्या रिपोर्टनुसार, महाभारतातील पौराणिक पात्र अश्वत्थामावर आधारित असलेल्या या चित्रपटासाठी जिओ स्टुडिओ आणि आदित्य धर यांनी अल्लू अर्जुनसोबत चर्चा सुरू केली आहे.
आदित्यला शोधावा लागतोय लोकप्रिय नायक - चित्रपटाच्या निर्मात्यांना अल्लु अर्जुन मुख्य कलाकार म्हणून हवा आहे. परंतु, अद्यापही अल्लु अर्जुनने आपला होकार कळवलेला नाही. कारण त्याच्याकडे निर्माणाधिन असलेले व निर्मितीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असलेले अनेक चित्रपट आहेत. अल्लु अर्जुन सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट पुष्पा: द रुलमध्ये पुरता गुंतला आहे. त्याने त्रिविक्रम श्रीनिवास सोबत एक चित्रपट आणि अर्जुन रेड्डी या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा सोबत एक पॅन इंडिया चित्रपट देखील साइन केला आहे. चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे आणि अल्लू अर्जुन आदित्य धरच्या द इमॉर्टल अश्वत्थामाला हिरवा कंदील देतो की नाही हे येणारा काळच ठरवणार आहे.
आदित्य धरचा ड्रीम प्रोजेक्ट - निर्माता रॉनी स्क्रूवाला यांच्या RSVP बॅनरखाली द इमॉर्टल अश्वत्थामा या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. रॉनीने प्रकल्पातून माघार घेतल्यानंतर, जिओ स्टुडिओने चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी पाऊल टाकले परंतु विकीच्या जागी एका मोठ्या स्टारला आणण्याची अट घालण्यात आली होती. आदित्य धर आणि विकी कौशल यांची चांगली मैत्री आहे. परंतु आपला ट्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आदित्यला आता दुसरा लोकप्रिय नायक शोधावा लागत आहे.
हेही वाचा - Kriti Sanon recalls sobbing : 'पहिल्या फोटोशूटनंतर घरी येऊ रडले होते', क्रिती सेनॉनने केला खुलासा