मुंबई - नायक नायिकांच्या अनोख्या जोड्या प्रेक्षकांना भावतात हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच निर्माते दिग्दर्शक आधी न काम केलेल्या कलाकारांना शीर्षक भूमिकांतून एकत्र आणत असतात. तसं बघायला गेलं तर अभिनय बेर्डेचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. तसेच सायली संजीवच्या भोवती ग्लॅमरचे वलय तर आहेच परंतु ती एक सशक्त अभिनेत्री म्हणूनही प्रसिद्ध आहे. या दोघांनी याआधी एकत्र काम केलेलं नाहीये. म्हणूनच 'ना पुन्हा' मधून मेकर्सनी या दोन तरुण सुपरस्टार्स ना एकत्र आणलं आहे. अर्थातच अभिनय बेर्डे सायली संजीवला, 'ये ना पुन्हा"म्हणत साद घालतोय असं म्हणायला नक्कीच वाव आहे.
नजीकच्या काळात हिंदी मधील चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटत असताना काही मराठी चित्रपटांनी घवघवीत व्यावसायिक यश मिळवलंय. याने मराठी चित्रपटसृष्टीचा हुरूप नक्कीच वाढला असून अनेक नव्या चित्रपटांची घोषणा होताना दिसतेय. मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र येणारे अभिनय बेर्डे आणि सायली संजीव यांच्या प्रमुख रोमँटिक भूमिका असणाऱ्या, 'ये ना पुन्हा', या चित्रपटाची घोषणा झाली आहे. प्रेम ही भावना प्रत्येक मनुष्याच्या आयुष्याला स्पर्शून गेली असतेच. प्रेमाला वयाची मर्यादा नसते म्हणूनच कोवळ्या वयातही प्रेमांकुर फुटत असतात. तारुण्याच्या उंबरठयावर असलेल्या आकर्षणाचे पुढे खऱ्या प्रेमात रूपांतर होण्याची शक्यता अधिक असते. मैत्रीच्या नात्याचे प्रियकर व प्रेयसी मध्ये रूपांतर होताना बऱ्याचदा दिसत असते. त्यातील भावनांचे उतार चढाव दाखवणारा चित्रपट म्हणजे 'ये ना पुन्हा'.
आपल्या चित्रपटांत संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातच चित्रपट रोमँटिक असेल तर संगीत अजूनही महत्त्वाचे बनते. 'ये ना पुन्हा' हा रोमँटिक चित्रपट म्युझिकल सुद्धा असून म्युझिकल चित्रपटाला मिळालेली रोमँटिक साथ चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल. संगीतमय वातावरणात सायली संजीव आणि अभिनय बेर्डे या जोडीचे प्रेम बहरताना दिसणार आहे. या चित्रपटातून संगीताची बहरदार मैफिल प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे अशी ग्वाही निर्माते देताहेत.
संगीताची बहरदार मैफिल घेऊन येणाऱ्या सायली संजीव आणि अभिनय बेर्डे यांच्या 'ये ना पुन्हा' या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत तेजस कुलकर्णी. या चित्रपटात समीर धर्माधिकारी, अमोल कागणे, नितीश चव्हाण, आशय कुलकर्णी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. निर्माते लक्ष्मण कागणे, किरण कुमावत, स्वाती खोपकर, हर्षवर्धन गायकवाड, सागर पाठक आणि अमोल लक्ष्मण कागणे यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा वाहिली असून निनाद बत्तीन, तबरेज पटेल हे सहनिर्माते आहेत. 'फिल्मस्त्र स्टुडिओ'च्या बॅनर खाली हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या रोमँटिक आणि म्युझिकल चित्रपटात सायली संजीव आणि अभिनय बेर्डे यांच्यातील लव्हेबल केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असे दिग्दर्शकाचे मत आहे. 'ये ना पुन्हा' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.
हेही वाचा - Bhool Bhulaiyaa 3 : भूल भुलैया 3 सह रुपेरी पडद्यावर पुन्हा परतणार कार्तिक आर्यन