माधुरी दीक्षित म्हणजे सौंदर्याची खाण आणि आजही जवळपास चाळीसेक वर्षांच्या कारकिर्दीनंतरही तिचं (खरंतर फिल्म कलाकारांना एकेरी संबोधिल्यावर आपुलकी वाढते) सौंदर्य अबाधित आहे. किंबहुना इतक्या वर्षांच्या वाटचालीनंतर ते अजूनही जास्त खुलून आलंय. १९८४ साली अबोध या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत दाखल झालेली षोडशवर्षीय माधुरी आजही टवटवीत वाटते. तिची प्रमुख भूमिका असलेला ‘मजा मा’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्या चित्रपटाच्या निमित्ताने आमच्या प्रतिनिधीने माधुरी दीक्षित नेने यांच्याशी संवाद साधला.
सर्वप्रथम माधुरी, तमे केम छो? - (खळखळून हसत) मजा मा! - तुमचा नवीन चित्रपट येतोय, मजा मा, त्याबद्दल काय सांगाल?
चित्रपटाच्या नावावरून कल्पना आलीच असेल की हा चित्रपट एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबाभोवती फिरतो. यात मी एक प्रेमळ आई आहे, कर्तव्यदक्ष पत्नी आहे. ती आपल्या कुटुंबासाठी झटणारी स्त्री आहे. भलेही ती गृहिणी असली तरी तिला आपली मते आहेत ज्यावर ती ठाम असते आणि आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट आल्यावर खंबीरपणे त्याचा सामना करते. तिच्या मुलाची श्रीमंत मुलीबरोबर झालेली एंगेजमेंट तुटते आणि ती खंबीरपणे सर्व गोष्टींचा मुकाबला करते. अर्थातच तुम्हाला चित्रपट पाहून अजून ‘मजा’ येईल. खूप चांगली भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. त्यातच मला यात नृत्य करायलाही मिळाले आहे. आणि ते म्हणजे ‘सोनेपे सुहागा’. ‘मजा मा’ मधील गरबा त्याचा हाय पॉईंट आहे.
सध्या तुमच्या करियरची सेकंड इनिंग्स सुरु आहे. तुम्ही या चित्रपटाला तुमचा कमबॅक म्हणाल का? - कमबॅक वगैरे काही नाही. मी सतत काम करीत आले आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की माझ्याकडे उत्तमोत्तम भूमिका चालून येताहेत. आयाधी ‘फेम गेम’ मधेही मला सुंदर भूमिका मिळाली होती. त्यात मी आई, पत्नी यासोबत एक यशस्वी अभिनेत्री होते. तिची व्यक्तिगत मते खूप स्ट्रॉंग होती. परंतु मजा मा मध्ये माझ्या कॅरॅक्टरला गृहीत धरतात. दैनंदिन जीवनात अश्या गृहिणी आढळतात. मला नेहमीच महिला सक्षमीकरणाला पाठिंबा देणाऱ्या भूमिका करायला आवडतात. आणि आताही अश्या भूमिका माझ्याकडे येताहेत ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.
सध्या ओटीटी मुळे तुमच्या वयाच्या अभिनेत्रींना सशक्त भूमिका मिळू लागल्या आहेत. त्याबद्दल तुमचे काय मत आहे? - ओटीटी मुळे अनेक वयाच्या कलाकारांना छान छान भूमिका मिळू लागल्यात. मध्यमवयीन स्त्रीचे करायचे काय हा प्रश्न चित्रपटकर्त्यांना पडायचा किंवा पडतो. कारण तिथे व्यावसायिक गणितांना जास्त महत्व दिले जाते. चाळीशी पार केलेल्या अभिनेत्रींसाठी हा प्लॅटफॉर्म म्हणजे वरदान आहे. आता या अभिनेत्रींना उत्तम स्क्रिप्ट्स मिळताहेत कारण इथे व्यावसायिक मर्यादा नाहीयेत. तसेच प्रत्येक भूमिका विस्ताराने मांडता येते. म्यॅच्युअर विषयांना हात घालता येतो. पुढे जाऊन सांगायचे म्हणजे नव्वदीमध्ये फिल्म मेकिंग खूप विस्कळीतरीत्या केले जायचे. एका चित्रपटाला साधारणतः एक दिड वर्ष लागायचं. माझ्या तर एका चित्रपटाचं शूटिंग तब्बल सात वर्ष सुरु होतं. परंतु आता फिल्म इंडस्ट्री खूप ऑर्गनाईझ्ड झालीय. प्रत्येक सीन कसा होणार आहे, कुठे होणार आहे, नटांचे लूक्स काय असणार आहेत ई सर्व आधीच ठरले असते. आम्हा कलाकारांना ठरल्या वेळी येऊन दिलेले सीन्स करून जायचे असते. माझ्यामते ही कलाकारांसाठी उत्तम गोष्ट आहे. कारण ते शूटिंग वेळेत संपवून आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवू शकतात. तसेच एक फिल्म करून एखादी सुट्टी घेऊन दुसऱ्या प्रोजेक्ट साठी वेळ देऊ शकतात.
तुम्ही अभिनेत्री तर उत्तम आहातच, तसेच उत्कृष्ट नृत्यांगना आहेत. भूमिकेसाठी यातील कुठल्या गोष्टीला प्राधान्य देता? - डान्स माझा अविभाज्य भाग आहे आणि नृत्यात अभिनय असतोच. त्यामुळे मला दोन्ही प्रिय आहेत. अर्थात अभिनय करताना डान्स करायला मिळाला तर अत्युत्तम परंतु डान्स नाही म्हणून मी भूमिका अव्हेरणार नाही. मजा मा या चित्रपटात गरबा हा नृत्यप्रकार चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे मला यात भूमिका करायला मिळाली याचा डबल आनंद आहे.
तुम्ही निर्मात्या म्हणून दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. अजून काही बासनात आहे का? आणि हिंदी चित्रपट निर्मितीबद्दल काही प्लॅन्स आहेत का? - मी निर्माती म्हणून दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केलेली आहे, बकेट लिस्ट आणि १५ ऑगस्ट. आता मी ‘पंचक’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली आहे जो प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळेल. मराठी चित्रपटांच्या माध्यमातून मी निर्मीती व्यवस्थापन शिकत आहे त्यामुळे हिंदी चित्रपटनिर्मितीचा सध्या तरी काही विचार नाही.
सध्या बायोपिक चा जमाना आहे. माधुरी दीक्षित चा बायोपिक येणार आहे का? - इतक्यात नक्की नाही. मला अजून खूप काम करायचे आहे त्यामुळे नंतर कधीतरी बघू.
हेही वाचा - Lata Mangeshkar Song : लता मंगेशकर जयंती: नाइटिंगेल ऑफ इंडियाची आयकॉनिक गाणी