मुंबई - A Saga of Excellence : २१ व्या शतकातील महान नायक अमिताभ बच्चन यांच्या जीवनावरील 'अ सागा ऑफ एक्सलन्स' हे पुस्तक आता वाचकांच्या भेटीला येत आहे. बच्चन यांच्यावर बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रत्येक लेखकाने बिग बीसाठी आपले कौशल्य पणाला लावले आहे. चित्रपट जगतातील सर्वात मोठे नाव आणि चित्रपटाची 100 वर्षांचा इतिहास या शिवाय बच्चन यांचे माहित नसलेले पैलू या पुस्तकातून उलगडणार असल्याचा दावा औसाजाने केला आहे.
एस एम ए औसाजा यांनी लिहिलेल्या 'अ सागा ऑफ एक्सलन्स' या पुस्तकांमध्ये हरिवंशराय बच्चन यांच्या कारकीर्दी पासून ते अगस्त्य नंदा यांच्या फिल्मी क्षेत्रातील पदार्पणापर्यंतचे सर्व किस्से गुंफण्यात आले आहेत. या पुस्तकामध्ये भारतातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या बच्चन परिवाराचा समृद्ध इतिहास सामावला गेला आहे, असे म्हणता येईल. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून या पुस्तकाची सुरुवात आहे. अलाहाबाद येथून हरिवंशराय यांच्या कारकीर्दीला झालेली सुरुवात ते आता अगस्त्य नंदा याचे चित्रपट क्षेत्रातील पदार्पण हे या पुस्तकात चितारण्यात आले आहे.
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर केला शेअर - सुप्रसिद्ध सेने अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले असून या पुस्तकाबद्दल आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे एस एम ए औसाजा यांनी अत्यंत मेहनतीने एक दस्तावेज तयार केला आहे. मी स्वतः विषयी बोलू इच्छित नाही, पण मी इतकंच सांगेन औसाजा यांनी ज्या पद्धतीने या पुस्तकांमध्ये अनेक माहितीचे संकलन केले आहे, दस्तावेजीकरण केले आहे ते अत्यंत प्रशंसनीय आहे. सिनेमाचे दस्तावेज करण्याची गरज असून भावी पिढीसाठी ते अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, अशा पद्धतीचे प्रयत्न अन्य ठिकाणाहूनही झाले पाहिजेत, असेही यावेळी बच्चन म्हणाले.
या पुस्तकाचे प्रकाशन ओम इंटरनॅशनलच्या अजय मागो यांनी केले असून हरिवंश राय बच्चन यांचे जीवन त्यांचे साहित्य आणि त्यांचे कौटुंबिक प्रसंग तसेच अमिताभ आणि अजिताभ यांच्या कारकीर्दीच्या आणि व्यावसायिक वाटचालीबाबत अनेक गोष्टी यात नमूद आहेत. अमिताभ बच्चन, जया भादुरी, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय यांच्या सिनेमातील करियर बाबत अनेक तपशील या पुस्तकात दिले आहेत. या पुस्तकाला सचित्र करण्यात आले आहे. बच्चन परिवाराविषयी जाणून घेणाऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक ठरेल, असा दावा अजय मागो यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना लेखक औसाजा म्हणाले की, बच्चन परिवारासोबत अनेक गोष्टी जोडलेल्या आहेत. त्यांनी चित्रपट आणि साहित्य क्षेत्रामध्ये दिलेले योगदान पाहता त्यांच्यावर पुस्तक लिहिणे ही एक अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे. त्यांच्या जीवनाचे आणि वेळेचे वर्णन करणे हे एक आव्हानात्मक काम होते. तसेच या कुटुंबाबाबतची सत्य माहिती आणि किस्से जाणून घेणे हे सुद्धा एक जीकिरीचे काम होते. मात्र या परिवाराने दिलेली वागणूक आणि केलेली मदत यामुळेच हे शक्य झाले. गेली बारा वर्षे आपण हा प्रयत्न करत होतो आणि अखेरीस हे पुस्तक रूपाने आपल्या समोर आल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -