कोलकाता - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९ मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. त्यामध्ये पश्चिम बंगालमध्येदेखील ८ जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात हिंसाचाराच्या घटना घडल्याचे समोर आले असतानाच आता सहाव्या टप्प्यातही गोळीबाराची घटना घडली आहे.
सहाव्या टप्प्यातील मतदानापूर्वीच बंगालच्या झारग्राममध्ये भाजपच्या बूथ कार्यकर्त्याचा मृतदेह आढळून आला आहे. तर अन्य दोघांवर गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये दोघेंही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व मेदिनीपूरच्या भगवानपूर मध्ये अनंत गुचेत आणि रंजीत मैती या दोन कार्यकर्त्यांनवर गोळीबार करण्यात आला आहे. तत्पूर्वी झारग्राममध्ये भाजपचा मतदान केंद्रावरील कार्यकर्ता रामेन सिंह याचा मृतदेह आढळून आला होता. रामेन सिंह यांचा तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून त्याची हत्या केली असल्याचा आरोप भाजपने केला आहे.