वडोदरा - गुजरातच्या आनंद येथील नागरिकाचा अमेरिकेत दरोडेखोरांनी गोळ्या मारुन निर्घृण खून केल्याने खळबळ उडाली. पती पत्नीसह त्यांच्या मुलीवरही दरोडेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. पिनल पटेल असे अमेरिकेत खून झालेल्या गुजरातच्या नागरिकाचे नाव आहे. तर त्यांची पत्नी रुपल पटेल ( वय 50 ) आणि मुलगी भक्ती पटेल ( वय 17 ) या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर अमेरिकेतच उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. मृत पिनल पटेल हे अमेरिकेतील अटलांटा शहरात राहत होते. त्यांच्यावर अमेरिकेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पिनल पटेल यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी स्वामीनारायण संप्रदायाच्या वतीने यज्ञाचे आयोजन केले होते.
पिनल पटेल यांच्यावर अंदाधुंद गोळीबार : आनंद शहराजवळील करमसाद येथील 52 वर्षीय पिनल पटेल 2003 पासून अमेरिकेतील अटलांटा शहरात राहतात. तेथे दुकान चालवून पिनल पटेल हे आपला उदरनिर्वाह चालवतात. शुक्रवारी ते पत्नी रुपल आणि मुलगी भक्तीसोबत बाहेर फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते घरी परतल्यानंत त्यांच्या घरात दरोडेखोर घुसले होते. यावेळी दरोडेखोर घुसल्याचे पाहुन पिनल पटेल यांनी दरोडेखोरांना निघून जाण्याविषयी सांगत विरोध केला. मात्र सशस्त्र दरोडेखोरांनी पिनल पटेल आणि त्यांच्या कुटूंबावर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये पिनल पटेल यांना पायापासून ते डोक्यापर्यंत गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी रुपल आणि मुलगी भक्ती या दोघीही गंभीर जखमी झाल्या.
गोळ्या लागल्यानंतरही मुलगी भक्तीने दाखवले धैर्य : पिनल पटेल यांच्यावर दरोडेखोरांनी प्रचंड गोळीबार केला. त्यामुळे ते जागीच कोसळले. यावेळी पिनल पटेल यांची पत्नी रुपल आणि मुलगी भक्ती या दोघीही गंभीर जखमी झाल्या. यावेळी पिनल पटेल यांना दहापैकी जास्त गोळ्या लागल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या शरिरातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे जखमी असतानाही त्यांची मुलगी भक्तीने आपले स्वेटर काढून पिनल पटेल यांच्या अंगावर गुंडाळले. मात्र तरीही रक्तस्त्राव थांबला नाही. त्यामुळे भक्तीने या घटनेची माहिती आपले मामा संजीवकुमार यांना दिली. रुपल आणि भक्ती या दोघींवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिीत सूत्रांनी दिली आहे.
पिनल पटेल यांचे सत्संगी कुटुंब : पिनल पटेल आणि त्यांचे कुटूंब हे सत्संगी कुटूंब असल्याचे ओळखले जाते. स्वामीनारायण मंदिर लोया धाम वडोदरा येथील दर्शन स्वामी यांनी पिनल पटेल आणि त्यांचे कुटुंब हे वर्षानुवर्षे स्वामीनारायण संप्रदायाशी जुळलेले असल्याची माहिती दिली. संजीवकुमार हेही सत्संगी आहेत. त्यांचा मुलगा गेल्या तीन वर्षांपासून त्यागाश्रमात टिळक भगत म्हणून संस्थेशी जोडला गेला आहे. घनश्याम प्रकाशदास स्वामी सध्या अमेरिकेत सत्संग विचाराचा प्रसार करत आहेत. त्यामुळे संजीवकुमार यांनी गुरू घनश्याम प्रकाशदास स्वामी यांना फोनवरून याबाबत माहिती दिली. त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी स्वामी रात्रभर जागल्याची माहिती त्यांनी दिली. गुरू घनश्याम प्रकाशदास स्वामी पिनल पटेल यांच्यावर मेक्कन येथे अंत्यसंस्कार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
हेही वाचा - Encounter Specialist Pradeep Sharma Bail : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; जामीन अर्ज फेटाळला