मीरा भाईंदर(ठाणे)- भाईंदर पश्विम परिसरातील समुद्र खाडीवर पोहायला गेलेला ३२ वर्षीय व्यक्ती वाहून गेला असल्याचे समोर आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून व्यक्तीला शोधण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली आहे.
दशरथ बाबू मुनिराज असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो भाईंदर पश्चिम परिसरातील खाडी परीसरात दोन मित्रांसह फिरायला गेला होता. काहीवेळ झाल्यानंतर मुनिराज पोहण्याकरता खाडीत उतरला.
खाडीजवळ रो-रो जेट्टीचे अर्धवट काम सुरु आहे. त्यामुळे जेट्टीवर नेहमीच अनेक युवक फिरायला येत असतात. परंतु, हा व्यक्ती जेट्टीवरुन पाण्यात पोहायला गेला असता वाहून गेला असल्याचे नागरिकांनी सांगितले.
घटनास्थळी पोलीस आणि मनपा अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. वाहून गेलेल्या व्यक्तीला खाडीत शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.