ठाणे -भंडारामधील सरकारी रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात आग लागून १० बालकांचा बळी गेल्याने देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर रुग्णालयात आग प्रतिबंधक उपाययोजनांचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. ठाणे शहरात १४० खासगी रुग्णालयांकडे फायर एनओसी नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी या रुग्णालयांना ४८ तासांची नोटीस देऊन ते सील करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश दिले.
भंडारा येथील दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्यानंतर रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. ठाण्यातही हजारो रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले की, ठाण्यातील नामांकित अशा १४० रुग्णालयांना फायर एनओसी नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने ४८ तासांची नोटीस देऊन रुग्णालये सील करण्यात यावीत, असे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, पालिका प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. ही सर्व रुग्णालये आजही खुलेआम सुरू आहेत.
तीन रुग्णालये सील, तासात पुन्हा खुली-
काही महिन्यांपूर्वी याबाबत काही कार्यकर्त्यांनी अग्निशमन अधिकारी आणि पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा तीन रुग्णालये सील करण्यात आली. मात्र, काही तासात ती पुन्हा खुली करण्यात आली. आरोग्य अधिकारी मुरुडकर यांच्या आदेशानेही रुग्णालये खुली करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे रुग्णालये खुली करताना अग्निशमन विभागाला कोणतीही विचारणा करण्यात आली नसल्याचे अग्निशमन अधिकारी सांगत होते. सील केलेली रुग्णालये एका मंत्र्याच्या आदेशाने उघडण्यात आल्याचा आरोप मोरे यांनी यावेळी केला आहे.

हेही वाचा-'भंडाऱ्यातील घटना प्रगतीशील महाराष्ट्राला काळिमा फासणारी'
आरोग्य विभागाने नियमांचे पालन तपासावे- अग्निशमन विभाग
दरम्यान, यासंदर्भात पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. मुरुडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, अग्निशमन विभागाचे अधिकारी गिरीश झळके यांना विचारले असता त्यांनी रुग्णालयांनी फायर एनओसी घेतली नसल्याचे सांगितले. रुग्णालयांचे सर्व नियम आरोग्य विभागाने तपासणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काही महिन्यांपूर्वी रुग्नवाहिकेत स्फोट होऊन बाळाचा मृत्यू
ठाण्यातील वर्तकनगर भागांमध्ये एका बाळाला रुग्णवाहिकेतून नेले जात होते. त्यावेळी ऑक्सिजन लिक झाल्यामुळे स्फोट झाला. या स्फोटात होरपळून बाळाचा मृत्यू झाला होता. प्रत्यक्षात पालिका प्रशासनाची बोटचेपी भूमिका ही राजकीय दबाव असल्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मुरुकर यांनी कबूल केले आहे.