ठाणे - परराज्यात पर्यटनासाठी एका व्यापाऱ्याने ( Trader Cheated By One lakh fraud ) टूर एजंटला विमानाची तिकिटे काढण्यासाठी एक लाख रूपये दिले. मात्र, व्यापाऱ्याकडून एक लाख रूपये घेऊनही व्यापाऱ्याला विमानाची तिकिटे दिलीच नसल्याने रक्कम परत मिळावी म्हणून व्यापाऱ्यानेत्या टूर एजंटकडे तगादा लावला होता. मात्र, व्यापाऱ्याचा मोबाईलनंबर ब्लॉक केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याने टूर एजंटवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राजेश पटेल असे गुन्हा दाखल झालेल्या टूर एजंटचे नाव असून तो मुंबईतील कांदिवली भागात राहणारा आहे.
रक्कम देऊनही विमानाचे तिकटे दिलीच नाही - व्यापारी दिनेश जगजीवन शहा (७०) हे कल्याण पश्चिम भागातील नव वृंदावन सोसायटीमध्ये राहतात. गेल्या वर्षी कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर दिनेश शहा यांना कुटुंबासह आसाम येथे पर्यटनासाठी जायाचे होते. गेल्या वर्षी २५ ते २८ ऑक्टोबरमध्ये पर्यटनासाठी विमान प्रवास, हाॅटेल नोंदणीची तयारी सुरू केली होती. त्यासाठी दिनेश यांचा कल्याणमधील मित्र किरीट पटेल यांनी दिनेश यांना पर्यटन प्रवासाची तिकिटे व इतर साहाय्यासाठी कल्याणमधील पर्यटन मध्यस्थ पूर्णिमा ठक्कर आणि त्यांचा मित्र आरोपी राजेश पटेल यांना सांगितले. आरोपी राजेश यांनी दिनेश यांना पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवून आसाम प्रवासाची विमान तिकिटे काढण्यासाठी एक लाख रूपये दिनेश यांच्याकडे मागितले. दिनेश यांनी आपल्या बँक खात्यामधून एक लाखाची रक्कम आरोपी राजेश पटेल यांच्या बँक खात्यावर जमा केली.
फरार टूर एजंटचा शोध सुरु - रक्कम आरोपीच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर आरोपी राजेशने दिनेश यांचे मित्र किरीट यांच्या मोबाईलवर तिकिटांचा नोंदणी क्रमांक पाठविला. नोंदणी नंतर प्रत्यक्ष तिकिटे हातात असणे आवश्यक होते. त्यामुळे दिनेश, किरीट यांनी आरोपी राजेश पटेल यांना मोबाईलवर गेल्या सहा महिन्यापासून रक्कम मिळण्यासाठी तगादा लावत संपर्क केल्याने आरोपीने त्यांचे मोबाईल नंबर ब्लॉक केला. तर दुसरीकडे आरोपी राजेशचा पत्ता तक्रारदार यांना माहिती नसल्याने त्यांचा शोध घेणे शक्य नाही. त्यातच आरोपी राजेशने आपली फसवणूक करून एक लाख रकमेचा अपहार केल्याचे लक्षात आल्याने दिनेश शहा यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात टूर एजंटवर गुरुवारी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे फरार टूर एजंटचा शोध सुरु केला आहे.