ठाणे : भुवनेश्वर- एलटीटी एक्सप्रेसमधून ( Bhubaneswar LTT Express ) ५५ किलो गांजासह ( ५५ KG Cannabis Seized ) तीन तस्करांना कल्याण आरपीएफने अटक केली ( Three Smugglers Arrested In Thane ) आहे. सम्राट बाबूलाल पात्रा (वय २६, रा. नेरुळ नवी मुंबई), संजू अहमद गाजी (वय १९ , रा. नेरुळ नवी मुंबई), अजगर अली बहादुर खान (वय २९ रा. बनेली- टिटवाळा ) असे अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत.
एसी बोगीत गांजासह तस्करांचा प्रवास..
मध्य रेल्वेच्या कल्याण आरपीएफ अधिकाऱ्याला भुवनेश्वर एक्सप्रेसमधून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी होत असल्याची गुप्त माहिती २२ फेब्रुवारीला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे इगतपुरी रेल्वे स्थानकापासून एक्स्प्रेसमध्ये सापळा रचला असता एका एसी कोचमधील ६३, ६४ सीट नंबरवर तीन संशयित प्रवासी आपसात भांडण करताना आरपीएफ पथकाला दिसले. पथकातील जवानांना पाहून संशयित प्रवाशांनी घाबरून सोबत असलेल्या ३ बॅगा पायाने सीट खाली ढकलल्या. त्यामुळे संशय अधिक बळावल्याने चौकशी केली असता तिन्ही बॅगमध्ये गांजा असल्याचे समोर आले.
![भुवनेश्वर- एलटीटी एक्सप्रेसमधून ५५ किलो गांजासह तीन तस्करांना अटक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-tha-1-kalyna-1-photo-mh-10007_24022022163408_2402f_1645700648_24.jpg)
५ लाख ५३ हजार ९५० रुपयाचा गांजा जप्त..
इगतपुरी दरम्यान गांजा तस्कर असल्याची माहिती आरपीएफच्या जवानांनी कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकात दुपारच्या सुमाराला फलाट क्र. ६ वर आगमन होताच आरपीएफच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या बॅगची झडती घेतली असता, बॅगेतून ५५ किलो ३९५ ग्रॅम वजनाचे २६ गांजाचे बंडल आढळून आले. या गांजाची बाजारभावात किंमत ५ लाख ५३ हजार ९५० रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आरपीएफने तिन्ही तस्करांना गांजासह कल्याण जीआरपीच्या ताब्यात दिले आहे. आता कल्याण जीआरपी या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा कुठून व कोणाला विक्री करणार होते याचा तपास सुरू केला आहे.