ठाणे : कल्याण-शीळ मार्गावरील डोंबिवली जवळच्या दावडी गावाजवळ सशस्त्र दरोडा घालण्यासाठी आलेल्या ६ दरोडेखोऱ्यांपैकी ३ जणांच्या मुसक्या आवळण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. हे ३ दरोडेखोर रिक्षा चालक आहेत. ते दिवसा रिक्षा चालवत आणि रात्रीच्या वेळेस चोऱ्यामाऱ्या, घरफोड्या आणि वाटमारीसारखे गुन्हे करत असल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले आहे.
मजर अनीफ शेख (२२) विकी इंद्रानं कसेरा (२२) आणि विराज अनिल कांबळे (२४), अशी या दरोडेखोरांची नावे आहेत. या ३ आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कल्याण-शीळ मार्गावरील दावडी रेजन्सी रोडला असलेल्या काशी दुर्गा इंटरप्राईजेस या दुकानावर दरोडा घालण्यासाठी ही दरोडेखोरांची टोळी येणार असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंगटे यांच्यासह पोलीस पथकाने गुरुवारी मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास या ३ जणांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, या टोळीचा म्होरक्या आणि त्यांचे २ साथीदार पोलिसांची झालेल्या झटापटीत अंधाराचा फायदा घेऊन निसटण्यात यशस्वी झाले. अटक केलेल्या ३ दरोडेखोरांकडून धारदार गुप्ती, सुरा, दोन लोखंडी कटावणी आणि नायलॉन रस्सी अशी दरोड्यासाठी लागणारी हत्यारे अवजारे आणि वेगवेगळ्या कंपनीचे १५ स्मार्टफोन असा ८२ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
दरोडेखोरांची टीम मोबाईल, चेन स्नेचिंग, मोबाईलच्या दुकानात चोरी आणि जबरी चोऱ्या करण्यात तरबेज आहे. यापैकी फरार दरोडेखोर अब्बास याच्यावर २ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. तर अटक केलेला आरोपी विराज कांबळे हा या टोळीकडून चोरी केलेले सामान काळ्याबाजारात विकण्याचा गोरखधंदा करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.