ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्वर्गीय सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील अनधिकृत दुकाने तोडण्याची कारवाई महापालिकेच्यावतीने करण्यात येत होती. या कामात डोंबिवलीतील शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांनी अडथळा आणल्याप्रकरणी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिवाय दंड न भरल्यास आणखी सहा महिने तुरुंगावासाची शिक्षा होणार असल्याचेही जिल्हा न्यायालयाने निकाल देताना नमूद केले आहे. तर निकालामुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. सदानंद थरवळ, शरद गंभीरराव, तात्यासाहेब माने अशी शिक्षा सुनावलेल्या माजी नगरसेवकांची नावे आहेत.
15 वर्षांपूर्वी घडली होती घटना -
डोंबिवली पूर्वे कडील एमआयडीसी भागात स्वर्गीय सावळाराम महाराज क्रीडा संकुल आहे. पंधरा वर्षांपूर्वी या क्रीडा संकुलात अनधिकृत दुकानांचे गाळे उभारण्यात आले होते. हे दुकानांचे गाळे तोडण्याची कारवाई सुरू असताना या तिन्ही माजी नगरसेवकांनी त्या कामात अडथळा आणल्याचा आरोप होता. याबाबत तत्कालीन उपायुक्त रवींद्र वाघ यांनी डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याच प्रकरणाची कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी अंतिम सुनावणी झाली. यावेळी न्यायधीश एस. एस. गोरवाडे यांनी या माजी नगरसेवकांना दोषी ठरवत दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकील अॅ ड. सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे.
वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार -
याबाबत शिक्षा झालेल्या नगरसेवकांशी संपर्क साधला असता या जिल्हा सत्र न्यायायालयाच्या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सदानंद थरवळ आणि तात्यासाहेब माने यांनी सांगितले. डोंबिवलीचे उपायुक्त वाघ हे कधीच कार्यालयात हजर राहत नव्हते. त्यांना महासभेत, कार्यालयात आम्ही जाब विचारला होता. मात्र, क्रीडा संकुलातील दुकानांचे गाळ्यांचा विषय त्यांनी कोठून आणला हे आम्हाला शेवटपर्यंत कळले नाही. क्रीडा संकुल आम्हा तिघा नगरसेवकांच्या प्रभागात नव्हते. तेथील गाळे वाचविण्याचा प्रश्न नव्हता, असेही या माजी नगरसेवकांनी सांगितले.