ठाणे - काकांच्या घरावरील पत्रे तोडून पुतण्यासह त्याच्या साथीदाराने घरातील सहा लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना उल्हासनगर कॅम्प ३ ओटी चौक परिसरात समोर आली होती. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या ४८ तासात पुतण्यासह त्याच्या साथीदाराला अटक केली. आरोपींकडून १७ तोळे दागिने हस्तगत करण्यात आले. जतिन वासुमल रामरख्यानी असे आरोपी पुतण्याचे नाव असून, लखन अनिल बुलानीया असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे.
उल्हासनगर कॅम्प ३ ओटी चौक परिसरात रमेश रामरख्यानी हे राहतात. गेल्या बुधवारी त्यांच्या घराचे पत्रे तोडून ६ लाख रुपयांचे दागिने चोरट्याने लंपास केले होते. दिवसाढवळ्या घडलेल्या चोरीच्या घटनेने पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले होते. त्यातच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर, राजकुमार कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक योगेश गायकर, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सलिम तडवी, पोलीस हवालदार संजय सुर्वे, संतोष भुंडेरे, पोलीस नाईक अनिल ठाकुर, सुभाष चव्हाण, संजय चैधरी, रवि गावीत, प्रविण पाटील हे पोलीस पथक चोरट्याचा शोध घेत होते.
या पोलीस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत चोरटा दुसरा कोणी नसून फिर्यादीचा पुतण्या व त्याचा साथीदार असल्याची माहीती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उल्हासनगरात सापळा लावून आरोपी जतिन वासुमल रामरख्यानी व लखन अनिल बुलानीया यांना अटक केली. त्यांच्याकडून १७ तोळयाचे सोन्याचे दागिने, एक सॅमसंग मोबाईल व एक रॅडो कंपनीचे घडयाळ असा एकुण ५० लाख रुपये किंमतीच्यावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी जतीन रामरख्यानी याने त्याच्या काकाच्या घरात चोरी का केली? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी दिली.