ठाणे- पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांतर्फे लढताना हजारो शीख सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले होते. या शहीद शीख सैनिकांच्या पराक्रमाची आठवण सदैव रहावी यासाठी लंडनमधील यॉर्कशयरजवळ एक स्मारक उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे या स्मारकासाठी वापरण्यात आलेला पुतळा हा कल्याणमधील एका युवा शिल्पकाराने बनवलेला असून कल्याणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जयदीप आपटे असे युवा शिल्पकाराचे नाव आहे.
शिल्पकला आणि त्यात कल्याणचे नाव निघाले तर जागतिक कीर्तीचे शिल्पकार भाऊ साठे हेच सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतात. भाऊ साठे यांनी बनवलेले अनेक पुतळे आज जगभरातील प्रमुख देशांमध्ये विराजमान झाले आहेत. त्यांच्यानंतर आता जयदीप आपटे या तरुणाने आपल्या सर्वोत्तम कलेच्या माध्यमातून जगाच्या नकाशावरील सातासमुद्रापार आपला ठसा उमटवला आहे. लंडनमधील यॉर्कशयरजवळ असणाऱ्या शहरात शीख सोल्जर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. ब्रिटिशांतर्फे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात लढताना आपल्या बांधवांनी केलेल्या अचाट पराक्रमाची सदैव आठवण रहावी या उद्देशाने हे स्मारक उभारण्यात आले आहे. नुकतेच त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.
या स्मारकासाठी जयदीप याने प्रातिनिधिक शीख सैनिकांचा सुमारे 7 फुटांचा ब्राँझचा पुतळा बनवला आहे. कल्याणमध्ये हा पुतळा बनवून त्यावर नाशिकमध्ये ब्राँझचे कास्टिंग करण्यात आले. त्यानंतर 10 ऑगस्टला तो बोटीने लंडनला पाठवण्यात आला. तो ज्यांना गुरुस्थानी मानतो अशा भाऊ साठे यांच्यानंतर आपला पुतळा परदेशात जात आहे ही कल्याणकरांसाठी निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे जयदीप याने सांगितले.