ठाणे - भरधाव जाणारी रिक्षा खड्यामुळे पलटी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना कल्याण-भिवंडी मार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेल समोर घडली आहे. दरम्यान, या अपघातापूर्वी याच खड्यात एका नागरिकाचा अपघात झाला होता. त्याच नागरिकाने येथील अपघात ठिकाणावरील त्या खड्ड्याजवळ व्हिडीओ काढला आहे. त्यामध्ये हा भरधाव जाणारा रिक्षा पलटी झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कल्याण-भिवंडी मार्गावर गेल्या तीन वर्षापासून रस्ता रुंदीकरण करून सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम कासव गतीने सुरू असल्याने या मार्गावर अनेक अपघात होत आहेत. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. तर. अनेकांचे जीवही गेले आहेत. मात्र, अनेक वर्षापासून या रस्त्यावरील खड्याचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. त्यातच अर्धवट असलेल्या सिमेंट रस्त्यावर जागोजगी खड्डे आहेत. असाच एक खड्डा कल्याण - भिवंडी मार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेल समोर आहे. याच खड्यामुळे १० दिवसापूर्वी रिक्षा पटली होऊन अपघात झाला होता. याप्रकरणी त्यावेळी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती. त्याच अपघाताच्या थराराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.
खड्डे दुरुस्तीचा प्रश्न कधी सुटणार?
जिल्ह्यात सर्वाधिक खड्यांचे साम्राज्य भिवंडी शहर व ग्रामीण भागात पसरले आहे. मात्र, जिल्ह्यातील मंत्री, विरोधी पक्षनेते केवळ या रस्त्याची पाहणी करण्यासाठी येतात. त्याचवेळी संबंधित अधिकारी रस्ता दुरुस्तीचे काम सुरु केल्याचे दाखवतात. मात्र, मंत्र्यांसह नेत्यांची पाठ फिरताच खंड्याचे काम अर्धवट असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे खड्यांच्या राजकारणावरून विरोधी पक्ष असलेले मनसे, भाजपचे लोकप्रतिनिधी व नेते महाविकास आघाडीला जबाबदार धरून रस्ता दुरुस्तीची मागणी करतात. यावर सत्ताधारी मंत्री म्हणतात पावसाळा गेला की, खंड्याच्या दुरुस्ती करण्यात येईल. मात्र, तोपर्यत खड्यामुळे अनेक अपघात होऊन त्यांमध्ये नागरिकांचा हकनाक बळी जात आहे. सध्या वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. लवक खड्डे दुरुस्तीचे काम करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून मदत देणे गरजेचे - बच्चू कडू