ठाणे - ठाण्यात आजपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होत असून पहिल्या लसीचा मान डॉ. वृषाली गौरवार यांना मिळाला आहे. कोरोनाकाळात त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन रुग्णांची सेवा केली. त्याचबरोबर कोरोनासारख्या विषाणूचा सामना करत दोन हात केले. त्यामुळे एकप्रकारे कोरोना योद्धा म्हणूनदेखील त्याच्याकडे पाहिले जात आहे. सुरुवातीच्या काळात ठाण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण घोडबंदर येथे आढळून आला. त्यावेळीदेखील डॉ. वृषाली गौरवार यांनी पुढे येऊन त्या रुग्णावर उपचार सुरू केले. त्यानंतर या रुग्णावर उत्तम उपचार केले. दरम्यान ठाणे महापालिकेच्या वतीने लस घेण्यासाठी देखील डॉ. वृषाली गौरवार यांनी पुढाकार घेऊन ठाण्यातील पहिल्या लसीचा मान पटकवला आहे.
गेल्या १० महिन्यापासून सेवा
ठाणे शहरात आजपासून कोविड 19 लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. एकूण चार केंद्रांवर ही लसीकरण मोहीम सुरू झाली. गेल्या 10 महिन्यांपासून कोरोना पोझिटिव्ह रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉ. वृषाली गौरवार यांना प्रथम लस देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात 400 लोकांना लस
शासनाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, मेडिकल स्टाफ, सफाई कामगार, पोलिसांना लस देण्यात येत आहे. यावेळी ठाण्यातील डॉ. गौरवार यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन कोरोनाच्या पहिल्या लसीचा मान मिळाविला.
अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन
ठाणे शहरामध्ये रोझा गार्डनिया, घोडबंदर रोड, कोरस, कळवा आणि कौसा आरोग्य केंद्र अशा एकूण चार केंद्रांवर ही लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली. लसीकरणाच्या या पहिल्या टप्प्यात एकूण ४०० आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे. महापालिकेकडून लसीकरणासाठीचा संदेश आल्याशिवाय अनावश्यक गर्दी न करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.