ठाणे - महानगरपालिका क्षेत्रात मागील काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेने पोलिसांच्या मदतीने सोमवारी (दि. 29 जून) एक बैठक घेत पालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ठाणे महानगरपालिका या संदर्भामध्ये नियमावली घोषित करू न शकल्यामुळे शहरातील लाखो नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना महानगरपालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
पोलिसांनी यासंदर्भामध्ये आपल्या ऑफिशियल ट्विटरच्या माध्यमातून लॉकडाऊनबाबत माहिती जाहीर केली. मात्र, महापालिकेकडून रात्री उशिरापर्यंत कोणतीच नियमावली काढण्यात आली नाही.
शहरातील साधारण 22 ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. या 22 ठिकाणची नावे देखील जाहीर करण्यात आली होती. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर जाहीर निवेदन देखील केले होते.
मात्र, सोमवारी (दि. 29 जून) सकाळी संपूर्ण ठाणे शहरच लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. सोमवारी ठाणे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीनंतर अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार होता. त्यामुळे सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू भरुन ठेवण्याचे आवाहन देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते.
संपूर्ण ठाणे शहरात गाडीवरून तशाप्रकारची उद्घोषणा देखील करण्यात आली होती. मात्र, संध्याकाळी संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन होत नसल्याचे ठाणे पोलिसांकडून सांगण्यात आल्याने हा संभ्रम अधिक वाढला. संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्यासंदर्भात पोलीस आणि ठाणे महापालिकेत एकमत न झाल्याने सोमवारी रात्री उशिरापर्यंत निर्णय होऊ शकलेला नाही.
ठाणे महापालिका आयुक्तांशी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि अधिकारी यांची चर्चा झाली असून ठाणे शहर लॉकडाऊन करणे अवघड होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्यातरी संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय केवळ विचाराधीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित) तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या जास्त आहे, अशा परिसरात निर्बंध कडक करण्यात येणार असल्याचे ठाणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या लॉकडाऊनवर प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी भाजपा आणि मनसेने यावर टीका केली आहे. आधीच मागील तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे होरपळलेल्या लोकांना आणखी अडचणीत आणू नका, असे आवाहन विरोधकांनी केले आहे. तर दुसरीकडे, पालिका प्रशासन या संदर्भात आदेश लवकर काढणार आहे आणि त्यांनी संगितल्या प्रमाणे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे पोलीस उपायुक्त अविनाश अम्बुरे यांनी सांगितले.
हेही वाचा - इंधन दरवाढी विरोधात ठाणे काँग्रेसचे धरणे आंदोलन; इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी