ठाणे - नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी केलेल्या 'ड्रंक अँड ड्राईव्ह' मोहिमेत तब्बल 1 हजार 673 तळीराम वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून दोषी वाहन चालकांचा परवाना जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा... गेल्या वर्षीच्या तुलनेत 31 डिसेंबर 2019 ला मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या संख्येत वाढ
नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज नागरिकांच्या आनंदात विरजण पडू नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. शहर आणि ग्रामीण मिळून तब्बल साडेसहा हजार पोलिसांचा फौजफाटा या बंदोबस्ताच्या कामी तैनात करण्यात आला होता. 450 वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी, अपघात आणि ड्रंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री सज्ज होते.
हेही वाचा... गुलाबराव पाटलांचे जळगावात जंगी स्वागत; मिरवणुकीत चेंगराचेंगरी, दोन महिला शिवसैनिक जखमी
यावेळी वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली होती. थर्टी फस्टच्या रात्री होत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी मागील काही वर्षांपासून पोलिसांनी ही मोहिम सुरू केली आहे. याविषयी जनजागृती करूनही अनेकजण नववर्ष स्वागताला रात्री मद्यप्राशन करून वाहने चालवतात. या तळीराम चालकांना आळा बसावा म्हणून यावर्षी पोलिसांनी जवळपास 60 ब्रेथ एनलायझरसह 54 पथके तैनात केली होती. या कारवाई अंतर्गत 31 डिसेंबरच्या रात्री ते 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत वाहतूक पोलिसांनी तब्बल 1 हजार 673 तळीराम चालकांवर कारवाई केली. दारू पिऊन गाडी चालविणाऱया या वाहन चालकांचे वाहन परवानेही रद्द होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा.... देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला अर्थमंत्री जयंत पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...