ठाणे - शहरातून मुंबईला जाणाऱ्या कोपरी पुलाचा वापर करण्याआधीच तडा गेल्याचे ठाणे-पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी निदर्शनास आणून दिले होते. यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आणि केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने आज मनसेच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या कोपरी पुलावर टाळ मृदुंग वाजवून आंदोलन करण्यात आले.
पोलीस आणि आंदोलकात बाचाबाची -
आंदोलन करण्यापूर्वीच ठाणे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवले, यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काहीकाळ बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. मात्र, मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम होते. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ढोलकी, टाळ, मृदुंग वाजवत केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेध करत कारवाईची मागणी केली. यावेळी संबंधित ठेकेदाराच्या पाठीशी राजकिय वरदहस्त असल्याचा आरोप देखील केला. दरम्यान ठाणे पोलिसांनी मनसेच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनादरम्यान मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मास्कचा वापर केला नव्हता व कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवलेले पाहायला मिळाले.
कोपरी पुलाबाबत मनसे आक्रमक -
ठाण्यातील कोपरी पुलाच्या बाबतीत सुरुवातीपासूनच मनसे आक्रमक होती. त्यांनी आतापर्यंत अनेकदा कोपरी पुलाबाबत आंदोलन केले. आता कोपरी पुलाच्या या भेगा गेलेल्या भागाची पाहणी आयआयटी कडून करण्यात येणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने या भागाची दुरुस्ती करणे किंवा मग पुनर्बांधणी करण्याचे काम केले जाणार आहे. मात्र, मनसेने उद्घाटना पूर्वीच केलेल्या आंदोलनामुळे, कोपरी पुलाचे उद्घाटन मात्र तूर्तास टळले आहे.