ठाणे - शहराला दहीहंडी सणाची पंढरी मानली जाते. या वर्षी कोल्हापूर सांगलीतील पूराच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील अनेक मंडळांनी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचे ठरवले आहे, मात्र संस्कृती युवा प्रतिष्ठानने पूरग्रस्तांप्रती संवेदना ठेऊन दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.
दहीहंडी हा केवळ उत्सव नसून, एक गौरवशाली संस्कृती आणि परंपरा आहे. तरुणाई वर्षभर या सणाची वाट पाहत असते. केवळ महाराष्ट्रातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही दहीहंडीने मानाचे स्थान पटकावले आहे. हीच संस्कृती, परंपरा कायम ठेवण्यासाठी या वर्षीही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
संस्कृतीकडून पूरग्रस्तांप्रती संवेदना ठेऊन संस्कृतीचे रक्षण
संस्कृती प्रतिष्ठानकडून या वर्षीही दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे, मात्र हे आयोजन करण्याआधी कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे व्हावेत म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार प्रताप सरनाईक यांनी मजरेवाडी हे पूरग्रस्त गाव दत्तक घेतले आहे.
आपली परंपरा सुरू रहावी म्हणून दहीहंडी उत्सव आम्ही यंदाही साजरा करू पण त्याचवेळी पूरग्रस्तांना अधिकाधिक सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे, संस्कृती युवा प्रतिष्ठानचे सचिव पुर्वेश सरनाईक यांनी सांगितले आहे.
संस्कृतीकडून प्रो-गोविंदाचे आयोजन
संस्कृती युवा प्रतिष्ठानकडून दहीहंडी सण प्रो-गोविंदाच्या माध्यमातून साजरा केला जातो. सर्व मंडळांचा विमा तपासून आणि विमा नसल्यास त्यांना विमा काढून दिल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे. प्रतिष्ठानतर्फे पाहिले पारितोषिक 5 लाख रूपये आहे. यावर्षी ज्या मंडळांना पारितोषिके मिळणार आहेत, त्यांच्या ईच्छेनुसार ते या ठिकाणी पुरग्रस्तांना मदत म्हणून देणगी देवू शकतात, तशी सोय प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे.