ठाणे - मुंब्रातील लकी कपाऊंड पत्त्यासारखी कोसळल्यानंतर ठाणे पालिकेने गांभीर्याने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंब्रा परिसरातील बॉम्बे कॉलनीमधील मरियम अपार्टमेंट शनिवारी पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रिकामी केले. या इमारतीमधील ६२ कुटुंबे विस्थापित झाली आहेत.
मुंब्रातील लकी कपाऊंड कोसळल्यानंतर तब्बल ७४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भिवंडी येथील इमारत दुर्घटनांसारखी पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंब्रा परिसरातील मरियम अपार्टमेंट शनिवारी पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रिकामी केले आहे.
मुंब्रा प्रभाग समितीच्या बॉम्बे कॉलनीमधील मरियम अपार्टमेंट ही ४० वर्षे जुनी इमारत आहे. ही इमारत अतिधोकादायक झाल्याने मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे, कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी यांच्या उपस्थितीत रिकामी करण्यात आली आहे.
या इमारतीत तब्बल ६२ कुटुंबे राहत होते. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट २६ जुलै, २०१९ रोजी करण्यात आले होते. ही इमारत दुरुस्त करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, इमारतीचे दुरुस्तीचे काम झाले नव्हते. त्यामुळे इमारतीच्या मागची बाजू धोकादायक झाली होती.
ही कमकुवत इमारत पडण्याच्या स्थितीत असल्याने इमारतीतील ६२ कुटुंबांना इमारतीमधून बाहेर काढण्यात आले. यावेळी पोलीसही उपस्थित होते. कुटुंबांची पुनर्वसनाची व्यवस्था करून इमारत खाली करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.