ठाणे - गेल्या काही दिवसात ठाणे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. याबाबत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व यंत्रणांची बैठक घेण्यात आली. यापुढे अशी परिस्थिती ओढवू नये आणि ओढावली तरी त्यावर तत्काळ उपाय योजना करण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली. ज्या प्रकारे पालिकेच्या अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली, त्याच प्रकारे एमएमआरडीए, एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, नॅशनल हायवे या विभागांनादेखील अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यात जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंकडून यंत्रणेला विविध सुचना -
खड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी आपण सर्व यंत्रणासोबत घेऊन रस्त्यांची पाहाणी केली असून येत्या आठवड्यात सर्व रस्त्यांची डागडुजी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भिवंडी बायपासवरील खड्डे बुजवण्यासाठी ५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे. माजिवडा-पडघा या रस्त्यांसह शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापुढे जे रस्ते तयार करण्यात येतील. ते अवजड वाहनांसाठी चांगल्या दर्जाचे असावेत, यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच अवजड वाहनासाठी शहराबाहेर तर्क टर्मिनल उभे करण्यासाठी जेएनपीटी, सिडको यांना तसेच पालघर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना सूचना करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी आणि वाहतुकीचे योग्य नियमन व्हावे, यासाठी आठ दिवस अवजड वाहनांची वाहतूक रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान करण्यात यावी, असे निर्देश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. आठ दिवसानंतर परिस्थिती बघून दुपारी १२ ते ४ दरम्यान अवजड वाहतुकीचा विचार होऊ शकतो, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
काँक्रीटच्या रस्त्यांचा दर्जा तपासणार -
शहरात मोठ्या प्रमाणात काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले असले तरी त्यावरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या दर्जाची तपासणी करण्यात यावी आणि संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत.
टक्केवारीचे पुरावे द्या -
भाजपा आमदार संजय केळकर यांनी शहरातील रस्त्यांवर टक्केवारीमुळे खड्डे पडले असल्याचा आरोप केला आहे, यासंदर्भात विचारले असता विरोधीपक्षांनी पुराव्यासहित आरोप करावे, असा पलटवार शिंदे यांनी केला. पोलिसांना पेट्रोलिंग करण्यासाठी वाहने पुरवणार डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण हे माणुसकीला काळिमा फासणारे असून यातील बहुतांशी आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच इतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार आहे. यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलिसांना निर्जन वस्तू, पडीक इमारती यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांना पेट्रोलिंग करण्यासाठी सरकारकडून आधुनिक वाहने पुरवण्यात येणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा - झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी 'भारतबंद' - नाना पटोले