ठाणे - कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असतानाच त्यावर मात करण्यासाठी सगळ्याच शासकीय यंत्रणा धडाडीने काम करत आहेत. सामान्य नागरिक देखील कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी घरात बसला आहे. घरात बसलेल्या नागरिकांना आणि कोरोनाशी दोन हात करणाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी सिंघानिया शाळेतील सहावीत शिकणाऱ्या एका चिमुरड्याने सर्व मित्रपरिवाला सोबत घेऊन एक व्हिडियो तयार केला आहे. यामध्ये सर्व विद्यार्थी आपापल्या घरातून 'हम होंगे कामयाब'चा नारा देत सामाजिक संदेश देणारा व्हिडिओ बनवला आहे.
देशाचे जबाबदार नागरिक म्हणून या गाण्याच्या माध्यमातून कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर्स, पोलीस तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना मानवंदना देण्याचा प्रयत्न केलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही फिल्म प्रसारित केली असून भारतीय नागरिक कोरोनाशी कसे दोन हात करत आहेत, याचे चित्र उभे केले आहे.