ठाणे - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलासमोर खोट बोलणारी शिवसेना आज भाजपमधील अफजल खानाच्या मिठीत असल्याचा टोला शरद पवार यांनी उध्दव ठाकरेंना लगावला. ते कल्याण लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या उल्हासनगरामधील सभेत बोलत होते. मोदी आता आमच्या कुटुंबातही नाक खुपसतात, अशी टीकाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यावेळी केली.
शरद पवार पुढे म्हणाले की, मोदी प्रत्येक भाषणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करतात. मात्र पाच वर्षात भाजप आणि शिवसेना यांनी काय केले ते मोदी सांगत नाहीत. शरद पवारांनी राफेल प्रकरणावरून मोदी आणि अंबानी यांच्यातील संबंधांवर टीका केली. ना खाऊंगा ना खाने दुंगा, असे ५६ इंचाची छाती असल्याचे सांगणारे मोदी हे राफेल प्रकरणात कोणी किती खाल्ले हे, याचा शोध घेण्याची तयारी दाखवित नाहीत. त्याचा शोध आमचे सरकार आल्यावर घेणार, असे संकेत त्यांनी यावेळी दिले.
मोदी आता आमच्या कुटुंबात नाक खुपसतो - शरद पवार
शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर खरमरीत टीका केली. ते म्हणाले, की मोदींनी स्वतःच्या संसाराचे काय केले, हे सर्वांना माहीत आहे. असा मोदी आता आमच्या कुटुंबात नाक खुपसतो. ज्याला कुटुंबच नाही, तो इतरांच्या संसारात ढवळाढवळ करतो, अशा शब्दात त्यांनी मोदींचा समाचार घेतला. मोदी नेहरुंवर टीका करतात, पण याच पंतप्रधान नेहरुंनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कारखाने आणले. इंदिरा गांधींनी पाकिस्तानला नमविले. राजीव गांधीनी दूरचित्रवाणी, संगणक आणि मोबाईल तंत्रज्ञान आणले. तर मोदींनी नोटबंदी आणून देशाची वाट लावली, असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार ज्योती कलानी, माजी खासदार संजीव नाईक, २७ गाव संघर्ष समितीचे गुलाब वझे, प्रमोद हिंदुराव, भरत गंगोत्री, प्रमोद टाले, अंजली साळवे, गुलाबराब करनजुले, सदा पतीलझ प्रशांत धांडे, राधाचरण करोतीया, कुलदीप सिंग माथारु आदी मान्यवर उपस्थित होते.
मग कार्यकर्त्यांनी घेतला काढता पाय -
शरद पवारांना सभेच्या ठिकाणी येण्यास उशीर झाला. त्यामुळे सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचे भाषण सुरू होताच काढता पाय घेतला. यावेळी अर्ध्याहून अधिक कार्यकर्ते सभेतून गेले होते. रिकाम्या खुर्च्या पाहून शरद पवारांनीही भाषण आटोपते घेतल्याचे दिसून आले आहे