ठाणे - ज्वालामुखीचा तालुका अशी नवीन ओळख निर्माण झालेल्या भिवंडी तालुक्यात अग्नीतांडव सुरूच असून शहर व ग्रामीण भागात सोमवार व मंगळवार या दोन दिवसात चार आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे या आगीच्या सत्रामुळे शहर व गोदाम पट्यात राहणाऱ्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
लाकडाची वखार जळून खाक -
पहिल्या घटनेत भिवंडी कल्याण रस्त्यावरील गोवेगाव ग्रामपंचायत हद्दीत उमिया सॉ मिल या लाकडाच्या वखारीसह सॉ मिल कारखान्यास भीषण आग लागण्याची घटना सोमवारी पहाटे घडली होती. लाकडाची वखार बंद असताना पहाटेच्या सुमारास ही आग लागली कशी याचे कारण अस्पष्ट असले. आगीची माहिती मिळताच भिवंडीसह कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशामक दलाच्या प्रत्येकी एक गाडी घटनास्थळी दाखल होत खाजगी टँकरच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करून तब्बल तीन तासांनी ही आग आटोक्यात आली.
झोपडीसह कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग -
दुसऱ्या घटनेत सोमवारी रात्री कोनगाव येथील टोलनाक्याच्या बाजूलाच असलेल्या कचऱ्याच्या ढिगाला आग लागल्याची घटना घडली होती. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अवघ्या काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळविले. तिसऱ्या घटनेत दिवे गाव येथे एका झोपडीला आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडली असून या आगीत जीवित हानी झाली नसली तरी झोपडी जाळून खाक झाली आहे.
यंत्रमाग कारखाना जळून खाक -
चौथ्या घटनेत धामणकर नाका अमीना कंपाऊंड येथील यंत्रमाग कारखान्याला आग लागल्याची घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली असून या आगीत तीन यंत्रमाग कारखाने जाळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने दोन तासांनी हि आग आटोक्यात आली आहे.