ठाणे - जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांकडून शेतातील खळ्यावर भाताच्या पेंढ्या बांधण्याचे काम सुरू आहे. ठाण्यातील कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावात एक शेतकरी कुटुंब खळ्यावर काम करत असतानाच, एक नव्हे तर तब्बल ३ विषारी घोणस प्रजातीचे साप त्यांना पेंढ्यांमध्ये आढळून आले. घाबरलेल्या या कुटंबीयांनी सर्पमित्रांसोबत संपर्क साधला. यानंतर सर्पमित्रांनी तिथे येऊन त्या सापांना पकडले आणि जीवदान दिले.
हेही वाचा... समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न झारखंडच्या जनतेने नाकारला - शरद पवार
भक्ष्याच्या शोधात आणि बदलत्या वातारणामुळे विषारी-बिन विषारी सापांनी मानवी वस्तीत शिरकाव करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या ३ महिन्यात सर्पमित्रांनी कल्याण पश्चिमेकडील मानवी वस्तीतून शेकडो सापांना पकडून जंगलात सोडले. सोमवारी सापर्डे गावात दादाजी पाटील यांच्या भात शेतातील खळ्यावर भाताचे भारे रचून ठेवण्यात आले होते. या भाऱ्यातील काही पेंड्या भात झोडणीसाठी काढण्याचे काम सुरु होते. ते करत असतानाच त्यांना पेंढ्यात एक नव्हे तर तब्बल ३ विषारी साप असल्याचे दिसून आले. साप पाहून घाबरलेल्या पाटील यांच्या कुटंबाने तेथून पळ काढला.
हेही वाचा... जळगाव : ट्रक व काळी-पिवळीचा भीषण अपघात ; 9 ठार तर 11 जण जखमी
त्यांनतर पाटील यांनी भाताच्या खळ्यातील भाऱ्यात साप घुसल्याची माहिती 'वार' संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांना दिली. माहिती मिळताच सर्पमित्र बोंबे आणि हितेश यांनी घटनास्थळी येऊन त्या अंत्यत विषारी अशा घोणस प्रजातीच्या तीनही सापांना पकडले. हे साप सोबत आणलेल्या प्लास्टिक ड्रमध्ये बंद केले. साप पकडल्याचे पाहून शेतकरी कुटूंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान हे तीनही साप अत्यंत विषारी घोणस प्रजातीचे असून ४ ते ५ फुट लांबीचे आहेत. सर्पमित्रांनी या सापांना कल्याण वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने सायंकाळी जंगलात सोडण्यात आल्याची माहिती सर्पमित्र बोंबे यांनी दिली.
हेही वाचा... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणांचे शिवसैनिकांकडून मुंडन