ठाणे - जिल्ह्यात सकाळ पासूनच पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील वंदना बस डेपो जवळ गुडघाभर पाणी साचले आहे. यातच तुरळक वाहने यातून वाट काढत आहेत. हवामान खात्याने असाच मुसळधार पाऊस सुरु राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नका, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
तसेच दिवसभरात आतापर्यंत 101 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तर काही भागात झाडे पडून गाड्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत.
एकूणच मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारपासून हजेरी लावल्यामुळे ठाण्यात नागरिक पावसाच्या आनंद घेत आहेत. यामुळे काही प्रमाणात उकाडा कमी झाला आहे. या पावसाने पालिकेच्या नालेसफाईची देखील पोलखोल केली आहे. त्यामुळे पालीका प्रशासनाने पुन्हा एकदा नालेसफाईची कामे हाती घेतली आहे. सखल ठिकाणी पाणी काढण्याचे काम देखील पम्प लावून आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पालीका प्रशासन करत आहे.
झाड पडून दोन वाहनांचे नुकसान
ठाण्यात घोडबंदर रोडवरील ब्रम्हांड येथील नाना-नानी पार्कमधील रस्त्यालगतचे झाड कोसळले. यामुळे रस्त्यावर लावलेल्या दोन गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने या अपघातात
कोणतीही जीवित हानी झाली नाही.
हेही वाचा - शिक्षिकेने केली क्वारंटाईन सेंटरची 'पोलखोल'; नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता