ठाणे - एकीकडे आमदारांना घरे देण्यावरून राज्यात वातावरण तापले असताना ठाण्यातील सातशे पोलिसांचे कुटुंबीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका पत्रामुळे हवालदिल झाले आहेत. ठाणे शहरातल्या पोलिस वसाहतीमधील पंधरा इमारती धोकादायक झाल्याने त्या तात्काळ खाली कराव्यात अशा आशयाचं पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस आयुक्तांना दिले आहेत आणि या पत्रानंतर आता या सर्व पोलिस कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.
700 कुटुंबीयांसमोर प्रश्न - ठाणे शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ 1980 साली बांधण्यात आलेल्या 15 इमारती धोकादायक झाल्याने त्या तात्काळ रिकाम्या कराव्यात असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे आता या 15 इमारतींमध्ये राहणाऱ्या 700 कुटुंबियांच्या समोर नवीन घर भाड्याने घेण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. आता तात्काळ मुलांच्या शाळा नोकरीचे ठिकाण आणि सर्व काही लगेच कसे करता येईल याची चिंता या कुटुंबियांना सतावत आहे. आमदारांना न मागता घर देता मग आम्ही एवढे वर्ष भाडे भरूनही आम्हाला का घर देत नाही. आमचे कुटुंबीय नागरिकांच्या सेवेसाठी जीव धोक्यात घालून काम करतात मग आमचा घरासाठी का विचार केला जात नाही असा सवाल आता हे कुटुंबीय विचारत आहे.
महिन्याला कापले जाते भाडे - एकतर छोटीशी घरे, त्यात सुविधांचा अभाव. मात्र या घरांसाठी महिन्याला पोलिसांच्या पगारातून 12 हजार ते 15 हजार भाडे कापले जाते. घर घेण्याची पात्रता नसल्यामुळे स्वतःचे घर घेता येत नाही आणि म्हणूनच दिवस ढकलण्याचे काम हे कुटुंबीय करत आहेत.आधीच भाडे कपात त्यात मुलांचे शिक्षण रुग्णालय खर्च घर खर्च करून मेटाकुटीला आलेल्या या कुटुंबियांना आता अचानक आलेले हे पत्र हवालदिल करणारे आहे.
कोणी दखल देईल का? - ठाण्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करणारे पोलीस आता त्यांच्या या सातशे कुटुंबीयांचा प्रश्न कोणी सोडवेल का, अशी आशा ठाण्यातील नेत्यांकडून करत आहेत. कोणत्याही पक्षातील नेत्याने यामध्ये तातडीने लक्ष घालून लागलीच पर्यायी व्यवस्था निर्माण करावे असे आवाहन हे कुटुंबीय करत आहेत. ठाण्यात पावसाळ्यात इमारती पडण्याचा मोठा इतिहास आहे. या सर्वच इमारतींच्या पिलर आणि स्लॅबला तडे गेलेले आहेत. त्यामुळे त्या कधीही कोसळू शकतात. आता एवढे वर्ष दुरुस्ती न केल्याने ही वेळ उद्भबली असल्याचे नागरिक सांगत आहेत.