ठाणे - एकीकडे कोरोनाने थैमान घातले असून दुसरीकडे खासगी रुग्णालयांनी लाखो रुपयांची बिले देऊन आधीच पिचलेल्या जनतेला अगदी जेरीस आणले आहे.
ठाण्यातील वेदांत रुग्णालयामध्ये कोविड-19 च्या रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात असल्याने सोमवारी मनसेतर्फे आंदोलन करण्यात आले होते. मनसेच्या दणक्यानंतर पीडित पोलिसाच्या दिवंगत वडिलांचे साडे पाच लाखांचे बिल माफ करण्याचा निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले. मात्र, या रुग्णालयाकडून आरोपाचे मात्र खंडन करण्यात आले आहे.
रुग्णालय प्रशासनाच्या मते पोलीस आणि त्याच्या कुटुंबाचे संपूर्ण बिल हे महाराष्ट्र सरकारकडे पाठवण्यात आले असून त्या पोलिसाकडून वैयक्तिकरित्या कोणतेही बिल आकारले गेले नाही. तरी एका परिवाराला जे बिल देण्यात आले, ते महानगरपालिकेच्या 'रेट कार्ड' प्रमाणेच देण्यात आले असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. तसेच पोलिसाच्या कुटुंबाचे बिल माफ करण्याचे आमचे सर्व प्रयत्न सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले.