मीरा भाईंदर(ठाणे) - टाळेबंदीमुळे वैद्यकीय क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक परिणाम झाले आहेत. परंतु कोरोना व टाळेबंदीचा परिणाम जुन्या वाहनांच्या (सेकंड हँड व्हिकल) विक्रेत्यांवर झाला नाही. उलट टाळेबंदीमध्ये जुन्या वाहनांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे.
महामारीमध्ये सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. तर अनेकांचे व्यवसाय पूर्णपणे बंद झाले. टाळेबंदी मुळे व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसानदेखील झाले आहे. त्यातच नोकर वर्गातील चाकरमान्यांवर उपासमारीची वेळ आली होती. परंतु टाळेबंदीतही जुन्या वाहनांची विक्री थांबली नाही. ग्राहकांडून ५० हजार ते २ लाखांपर्यंतच्या वाहनांची मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तर इतर वाहनांची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे जुन्या वाहनांची विक्री करणाऱ्या व्यापारी वर्गाला तितकेसे नुकसान झाले नाही.
कोरोनामुळे २२ मार्चपासून संपूर्ण देशात टाळेबंदी लागल्यानंतर अनेकांना चार महिने घरी बसावे लागले. सामान्य माणसाला व कामगार वर्गाला उदरनिर्वाह करणे कठीण झाले. परराज्यातील अनेक कामगार आपल्या मूळगावी पायी निघाले. त्यानंतर राजकीय पक्षाकडून रेल्वे सुरू करावी अशी जोरदार मागणी झाली. कालांतराने केंद्र सरकारने श्रमिक रेल्वे सुरू केली. पराराज्यतील नागरिक स्वतःचे खासगी वाहन घेऊनसुद्धा निघाले. परंतु श्रमिक रेल्वेची गर्दी पाहता अनेकांनी टूर्स अँड ट्रॅव्हलचा पर्याय निवडला. मात्र खासगी वाहन चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यात येत असल्याने अनेकांनी वाहन विकत घेवून प्रवास केला आहे. परराज्यात जाण्याकरिता प्रवासाला खासगी वाहनांसाठी लाख रुपये खर्च करण्यापेक्षा तितक्याच रुपयात जुने वाहन घेऊन प्रवास करणे अनेकांनी पसंत केले. त्यामुळे जुन्या वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे जुन्या वाहन विक्रेत्यांवर टाळेबंदीचा आर्थिक परिणाम तितकासा झाला नाही.
हेही वाचा-कोरोनाचा फटका: ऑस्ट्रेलियाच्या विकासदरात २८ वर्षानंतर पहिल्यांदाच घसरण
अनलॉक २मध्ये पराराज्यात जाण्यासाठी नागरिकांना परवानगी देण्यात आली. टाळेबंदी अगोदर जे वाहने विक्रीसाठी ठेवली होती, त्यांची विक्री कशी करावी, असा विक्रेत्यांसमोर प्रश्न होता. त्यात दोन महिने सर्व वाहने एकाच ठिकाणी उभी असल्याने अधिक खर्च वाढला होता. परंतु रेल्वे बंद असल्याने वाहन घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे ऑनलाईन विक्रीद्वारे आमच्याकडे छोट्या वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे थोडा आधार मिळाल्याचे आर्यन कार कंपनीचे मालक पुनीत शहा यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली.
हेही वाचा-'जी २० राष्ट्रसमुहात भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा सर्वात वाईट परिणाम'
प्रेम यादव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, की मला कुटुंबाला घेऊन उत्तरप्रदेशमधील आझमगढला जायचे होते. त्यासाठी सर्व वाहतुकीचे मार्ग बंद होते. पास घेऊन खासगी वाहन घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली. त्यासाठी मी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये जाऊन विचारपूस केली असता ७० हजार भाडे सांगितले. त्यामुळे मी १ लाख १० हजारात एक जुनी मारुती विकत घेऊन गावी गेलो. कायमस्वरूपी वाहन मिळाले. भविष्यात चारचाकीची विक्री केली तर थोडे पैसेदेखील मिळतील, अशी यादव यांनी अपेक्षा व्यक्त केली.