ठाणे - कल्याण-डोंबिवलीत कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे महापालिका पथकासह पोलिसांचे पथकही शहरात विनामास्क फिरणाऱ्या बेजाबदार नागरिकांवर कारवाई करत आहे. आतापर्यत लाखोंचा दंड वसूल केला. मात्र, अशाच एका विनामास्क कारवाई दरम्यान तीन जणांनी पोलिसांशी हुज्जत घालत पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्याने त्या कुत्र्याच्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी तीन परप्रांतीयांवर गुन्हा दाखल करत दोन जणांना अटक केली आहे. आनंद गुप्ता, सत्यनारायण गुप्ता, आदित्य गुप्ता असे आरोपींचे नावे आहेत.
मास्क कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर सोडला कुत्रा आधी पोलिसांची हुज्जत, नंतर अंगावर सोडले कुत्रे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक आजही विनामास्क फिरताना आढळून येत आहेत. अशा बेजबाबदार नागरिकांविरोधात महापालिका व पोलीस प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. मात्र बेजबाबदार नागरिक अनेकदा कारवाई दरम्यान पोलीस आणि पालिकेच्या पथकाशी हुज्जत घालत दिसत असतात. त्यातच मंगळवारी दुपारच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा रोडवर महापालिका व पोलिसांकडून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई सुरू होती. यावेळी एका गॅरेजच्या बाहेर तिघे विनामास्क आढळले या तिघांवर कारवाई करताना तिघांनी पोलिसांशी हुज्जत घातली एवढेच नाही तर पाळलेला कुत्रा पोलिसांच्या अंगावर सोडल्याने कुत्र्याच्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी तायडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
हेही वाचा - हृदयद्रावक..! दोन दिवस आईच्या मृतदेहाजवळ बसून होता दीड वर्षीय चिमुरडा; दुर्गंधी आल्यानंतर घटना उघडकीस