ठाणे - गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटाने अनेकांच्या हातचे कामधंदे हिरावून घेतले. तर उपचारासाठी खासगी रुग्णालयात गेलेले कंगाल होऊनच बाहेर पडले. असे असताना ठाण्यात मात्र एक सुखद धक्का देणारी घटना घडली आहे. येथील दिवा परिसरात राहणाऱ्या राजकांत पाटील हे कोरोनाचे उपचार घेऊन घरी परतताच त्यांना एक, दोन नव्हे तर चक्क पाच कोटींची डिअर लॉटरी लागली आणि त्यांना अनोखे लक्षमीदर्शन घडले.
पेशाने व्यवासायिक असलेल्या राजकांत पाटील यांचा दिव्यात मोठा बंगला असून येथे ते पत्नी, आई आणि दोन मुलांसोबत राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल होते. उपचारानंतर घरी येताच त्यांना डिअर लॉटरीकडून संपर्क साधण्यासाठी मेसेज आला. हा मेसेज पाहून ते आधी गोंधळले. उपचारामुळे शरीर आधीच कमजोर झाले होते. तर डोकेही चालेनासे झाले. पण कंपनीकडून सतत फोन येत होते. अखेर त्यांनी संपर्क साधला आणि काही क्षणातच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. लॉटरलीचा नंबर सांगितल्यावर डिअर लॉटरीज बैसाखी बंपर २०२१ चे पाटील हे ५ कोटींचे मानकरी असल्याचे सांगण्यात आले होते. सुरुवातीला विश्वास बसला नाही. मस्करी तर नाही ना की उगाच फसवणूक नको म्हणून पत्नीला त्यांनी सांगितले. तिने स्क्रिनशॉट काढून चौकशी केली तर खरंच लॉटरली लागली होती. मग मेहुण्याला फोन करून खरंखोट शोधून काढायला सांगितले. पण तेथूनही हेच उत्तर मिळाले. अशा कठीण काळातही तब्बल पाच कोटींची लॉटरी लागल्याने पाटील यांच्या आयुष्यात पुन्हा सकारत्मकता निर्माण झाली.
कोरोनाकाळात मदतीचा हात देणार-
व्यवसाय करत असलो तरी समाजसेवेचे व्रतही घेतले आहे. आमचे स्वताचे महिला बचत गट आहेत. त्यामाध्यमातून गरीब- गरजूंना शक्य तितकी मदत करत असतो. पण सध्या कोरोना काळ सुरू आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री एकनाथ शिंदे आदेश देतील त्यानुसार जास्तीत जास्त मदत या लॉटरीच्या पैशांतून लोकांना करणार असल्याचे राजकांत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - दिल्ली ऑक्सिजन संकट : आपत्कालीन स्थितीसाठी सरकार ठेवणार राखीव ऑक्सिजन साठा