ठाणे - बहीण भावाच्या नात्यातील गोडवा जपणारे दोन महत्वाचे सण म्हणजे रक्षाबंधन व आज असलेली भाऊबीज आहे. परंतु याच सणासाठी ठाण्याच्या मनोरुग्णालयात सुधारलेले रुग्ण आपल्या परिवाराची वाट पाहत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णांकडे घरातील व्यक्तींनी पाठ फिरवली आहे. बरे होऊनही या रुग्णांना पोरके जीवन जगावे लागत आहे.
दरवर्षी भाऊबीजेला मनोरुग्णालयातील सुधारलेले जवळपास सव्वाशे भाऊ व बहीणींचे डोळे आपल्या परिवाराच्या वाटेकडे लागले असतात. मानसिक संतुलन ढासळलेल्या रुग्णाला कुटुंबीयांकडून मनोरुग्णालयात भरती केले जाते. असे असले तरी त्यानंतर या रुग्णाची भेट घेण्यापुरताच कुटुंबाचा संबंध मर्यादित राहतो. रुग्णाचे उपचार व औषधे यांची जबाबदारी मनोरुग्णालय प्रशासनाने घेण्यात येते. तरी अशा रुग्णांबाबत असलेली समाजाची मानसिकतेत अद्याप बदल झालेला नाही. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मनोरुग्णांलयांकडून प्रबोधन केले जाते. असे असले तरी त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून येते.
मनोरुग्णालयात खास फॅमिली वॉर्ड-
उपचार घेणाऱ्या रुग्णांना कुटुंबीयांचा सहवास मिळाला तर त्यांना अधिक आधार वाटतो. तसेच त्यांच्या मानसिक अवस्थेत सकारात्मक बदल होतो. या विचारांनी मनोरुग्णालयाने फॅमिली वॉर्डही सुरू केला. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या वॉर्डासाठी महिला तसेच पुरुष यांच्या कुटुंबीयांसाठी दोन स्वतंत्र वॉर्डही तयार करण्यात आले. मात्र या संकल्पनेबाबत सकारात्मक दृष्टीकोन बाळगला जात नसल्याचे दिसून येते. रुग्णाला भरती करतानाच फॅमिली वॉर्डची माहिती देत कुटुंबीयांचे समुपदेशन केले जाते. मात्र तरीही या प्रक्रियेकडे बरेच नातेवाईक पाठ फिरवित आहेत.
सव्वाशे रुग्णांना घरी जाण्याची प्रतिक्षा
मनोरुग्णालय आणि रुग्ण यांबाबत असलेला पूर्वग्रह, विनाकारण बाळगली जाणारी भीती यामुळे सुधारलेल्या रुग्णांना ही परत घरी नेण्यासाठी घरातील मंडळी पाठ फिरवत आहेत. त्यामुळे असे रुग्ण सणाच्या दिवशी खासकरून रक्षाबंधन व भाऊबीजच्या दिवशी आपल्या घरातील मंडळांची आठवण काढतात. त्यादिवशी थोडे नाराज असतात. यासाठी रुग्णालयातील कर्मचारी अशा रुग्णांसाठी भाऊबीज सण रुग्णालयातच साजरा करतात. त्यांना मानसिक आधार देतात. जवळपास ९०० रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील जवळपास सव्वाशे रुग्ण हे घरी जाऊ शकतात. ते पूर्णतः बरे झालेत. परंतु यामधील एकाही रुग्णाला कुटुंबातील लोक परत घरी घेऊन गेले नाहीत.
मनोरुग्णालयाच्या चार भिंतीत उपचार घेणाऱ्या रुग्णांना कुटुंबीयांची साथ मिळावी यासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील फॅमिली वॉर्डाच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्यांसह राहण्याची संधी देण्यात आली. मात्र, याबाबत कुटुंबीयच उदासीन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कोविड काळात प्रशासनाने घेतली विशेष काळजी
ठाण्यातील या मनोरुग्णालयात राज्यभरातून हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. अशा वेळेस त्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. एवढेच नव्हे तर नातेवाईकांना भेटण्यासाठी ही काही बंधने रुग्णालय प्रशासनाने घातलेले आहेत. एकूणच राज्य सरकारच्या सर्व नियमावलीचे पालन याठिकाणी करण्यात येत आहे.
नातेवाईक का येत नाहीत?
घरातील मनोरुग्नामुळे आपली बदनामी होते, असा आग्रह धरून मनोरुग्णांचे नातेवाईक आई-वडील व भाऊ-बहीण हे त्यांना भेटायला येत नाहीत. याचे मोठे दडपण या मनोर रुग्णांवर असते. त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी वारंवार प्रशासन कळविते. मात्र, नातेवाईक भेटायला येत नाहीत. यामुळेच आजारातून बरे झालेले रुग्ण पुन्हा आजारात ओढवले जातात. अशा परिस्थितीत खरी मदतीची गरज ही कुटुंबीयांकडून असते. ती होत नसल्यामुळे अशा नातेवाईकांनाच खरे तर उपचार देण्याची गरज असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. या आजारातून बरे होण्यासाठी कुटुंबीयांची मदत हे गुणकारी औषध असू शकते असे मत ठाणे मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय बोदडे यांनी सांगितले.