ठाणे- ठाण्यातील सेलिब्रिटी लसीकरण प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. अभिनेत्री मीरा चोप्राप्रमाणे तब्बल २१ जणांना येथील ठेकेदाराने बनावट ओळखपत्र दिल्याची बाब समोर आली असुन यात आणखी एका अभिनेत्रीचा समावेश असल्याचे समोर आले आहे. बनावट ओळखपत्र वापरून सिने अभिनेत्री सौम्या टंडन हिने लस घेतल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या सेलिब्रेटी लस प्रकरणी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार आत्तापर्यंत यातील १५ जणांनी बेकायदेशीरपणे लस घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे महापालिकेच्या पार्किग प्लाझा या कोविड केंद्रात अभिनेत्री मीरा चोप्राला झालेल्या बेकायदेशीर लसीकरणानंतर महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने केलेल्या तपासावरून आत्तापर्यंत २१ जणांना अशाप्रकारे बनावट ओळखपत्र दिल्याचे समोर आले आहे. त्यातील १५ जणांनी बेकायदेशीरपणे लस घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद असतानाही पालिकेच्या पार्कींग प्लाझा येथील लसीकरण केंद्रात मीरा चोप्रा या अभिनेत्रीला फ्रंटलाईन वर्कर असल्याचे दाखवून लस देण्यात आली होती.