नवी मुंबई - गेल्या 25 वर्षांपासून नवी मुंबईतील 400 धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आहे. मागील कित्येक वर्षांपासून हा प्रश्न झुलत ठेवल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेला जीवितहानीचा पुरस्कार द्या, असा टोला आमदार मंदा म्हात्रे यांनी लगावला आहे.
मुंबईत काल (गुरुवार) भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळून 9 रहिवाशांचा मृत्यू झाला. अशीच विदारक परिस्थिती नवी मुंबईतील धोकादायक इमारतींची झाली आहे. तसेच गेल्या २५ वर्षांपासून येथील महानगरपालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दिलासा दिलेला नाही. त्यामुळे या मनपाला लोकांच्या जीवितहानीचा पुरस्कार द्यायला हवा, अशी गंभीर टीका भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी पालिका प्रशासनावर केली आहे.
हेही वाचा - म्हाडाच्या दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला मुख्य अधिकारीच नाही!
नवी मुंबई शहरातील ४०० धोकादायक इमारतीचा प्रश्न गेल्या २५ वर्षापासून प्रलंबित आहे. दुर्दैवाने या जुनाट इमारती कोसळल्यास मोठी जीवीत हानी होवू शकते. मात्र, नवी मुंबई मनपाने २५ वर्षात साधे संक्रमण शिबीर उभारले नाही. महापालिका फक्त पुरस्कार मिळवण्यासाठी दिखावा करते आहे. मात्र, प्रत्यक्षात लोकांच्या जीवाशी खेळत आहे, असा संताप आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेने मोडकळीस आलेल्या इमारतींचा तातडीने ॲक्शन प्लॅन तयार करावा, यासाठी मंदा म्हात्रे यांनी आज (शुक्रवार) मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. आठवड्याभरात धोकादायक इमारतींबाबत मनपा आयुक्तांनी योग्य ते पावले न उचलल्यास आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचेही मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.