ठाणे - गोठ्याच्या मालकाने एका मजुराच्या सांगण्यावरून दुसऱ्या मजुराला कामावरून काढल्याच्या वादातून एका मजूराने दुसऱ्या मजुराचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील चावींद्रा गावात घडली आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी मजुराला उत्तर प्रदेशमधील राहत्या घरातून गजाआड केले आहे. महेश प्रसाद सुरजपाल यादव ( वय. ४०, मूळ रा. माहुलीतर पारा, जि.कौशंबी, युपी ) असे अटक केलेल्या मजुराचे नाव आहे. तर भगरु उर्फ बैतुला इसमहंमद अंसारी ( वय. ५५ ) असे मृत मजुराचे नाव आहे.
भिवंडी तालुक्यातील चावींद्रा गावात सूर्यराव कंपाऊंडमध्ये रजि मुर्तूजा खर्बे (वय.४४ रा निजामपूरा ) यांचा म्हशींचा गोठा आहे. या गोठ्यात मृत भगरू आणि आरोपी महेश काम करत होते. मात्र, आरोपी महेशला गोठा मालकाने ११ जानेवारीला कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे मृत भगरु यानेच गोठा मालकाचे कान भरल्याने आपल्याला कामावरून काढल्याचा संशय महेशला आल्याने मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी महेशने फावड्याच्या दांडक्याने भगरु याच्यावर जोरदार प्रहार केल्याने भगरू रक्ताच्या थारोळ्यात पडला. आरोपी महेश याने गोठ्यातून पळ काढून थेट मूळगाव गाठले. त्यांनतर सकाळी मालक गोठ्यात आला त्यावेळी या खुनाचा प्रकार समोर आला.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात महेश यादव याच्या विरोधात गुन्हा खुनाचा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या आधारे एपीआय दिपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे, एएसआय प्रल्हाद तोडासे, पोलीस हवालदार आबेदअली सैयद आदींच्या पोलीस पथकाने उत्तर प्रदेश येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी महेश प्रसाद सुरजपाल यादव याला अटक केली. आरोपीला भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास भिवंडी तालुका पोलीस करत आहेत.