ठाणे - दिवाळी आणि दिवाळीतले किल्ले ही आपल्या महाराष्ट्राची वर्षानुवर्षे जपलेली परंपरा आता थेट पाश्चात्यांना भुरळ घालू लागली आहे. दिवाळीमध्ये किल्ले बनवायची आपली परंपरा आहे. अनेक सामाजिक संस्था किल्ले स्पर्धाही आयोजित करतात. आता चक्क जर्मनमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबीयांनी किल्ला बनवत या स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यांनी जंर्मनमधील राहत्या घरीच हा किल्ला बनवला आहे.
मृण्मयीने जर्मनीत किल्ला बनवून दिवाळी केली साजरी
ठाण्यातून जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात जाऊन स्थायिक झालेल्या अमोघ आणि श्रवंती या प्रभू दाम्पत्याला आपल्या लहानपणीच्या दिवाळीची खूप आठवण येत होती. ते या आठवणी आपल्या लहानग्या मुलीसोबत शेयर करत असतानाच तिचेदेखील कुतूहल जागृत झाले. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गडकिल्ल्यांचे. दिवाळीत किल्ले बनवण्याची मोठी परंपरा आहे. लहानग्या मृण्मयीने देखील किल्ला बनवण्याचा हट्ट आपल्या वडिलांकडे धरला. एकतर जर्मनीसारखा परका देश आणि त्यात कोरोनाचे दिवस, तरीही त्यांनी आपल्या लेकीच्या हट्टापायी एक छोटासा किल्ला घरात बनवला.
लहानग्या मृण्मयीला हे सर्व एवढे आवडले की तिने हा सर्व किस्सा आपल्या शाळेतील शिक्षकांना सांगितला. तिच्या शिक्षकांना देखील तिची ही कल्पना भावली व त्यांनी शिवरायांचे गडकिल्ले आणि महाराजांच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी तिला आमंत्रण दिले आहे.
राज्याभिषेक समारोह संस्थेचा पुढाकार -
ठाण्याच्या राज्याभिषेक समारोह संस्थेकडून गेली अनेक वर्षे दुर्गबांधणी स्पर्धा आयोजित केली जात असते. त्यासंबंधी आयोजकांनी संपूर्ण माहिती दिली. यावर्षी सदर स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जात असून, बालगोपाळ आणि युवकांमध्ये शिवरायांच्या दुर्गविज्ञानाची प्रचिती यावी यासाठी ही स्पर्धा आयोजित करत असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यात आता जर्मन परिवाराने या स्पर्धेत भाग घेतल्यामुळे एक वेगळीच प्रेरणा या संस्थेला मिळाली आहे.
जर्मनीमध्ये किल्ल्यांची मोठी क्रेझ
मृण्मयी जात असलेल्या शाळेत या किल्ल्याबाबत मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. शाळेतील इतर विद्यार्थी आणि पालकांना हा किल्ला आवडला असून, शिक्षक ही या किल्ल्यांबाबत आपुलकीने विचारपूस करत आहेत. हा किल्ला बनवण्यासाठी मृण्मयीच्या आई वडिलांना अनेक समस्या समोर आल्या. मात्र, आपली संस्कृती जपण्यासाठी त्यांनी हा खटाटोप केला आहे. प्रदूषणाबाबत जर्मनीमध्ये कठोर नियम आहेत. मात्र, तरी नियमांच्या आधीन राहून त्यांनी किल्ला तयार केला आहे.
हेही वाचा - बहुचर्चित 'तेजस एक्सप्रेस' होणार बंद... अखेर रेल्वे प्रशासनाने दिलं कारण
हेही वाचा - बाळासाहेबांचा स्मृतिदिन : असाल तेथून अभिवादन करा, मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन