ठाणे - लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले. यामध्ये रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांनादेखील आर्थिक फटका बसला. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सरकारने आर्थिक मदत करावी, म्हणून मनसे वाहतूक सेनेतर्फे हॉर्न बजाव आंदोलन करण्यात आले.
ठाण्यातील नितीन कंपनी येथील महामार्गावर रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी हॉर्न वाजवत सरकारने आता तरी आम्हाला मदत करावी अशी मागणी केली आहे. ज्या प्रमाणे होम लोनवरील हप्त्याला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली, तशीच मुदतवाढ रिक्षा लोनवरील हप्त्यावर आणि इन्शुरन्स मुदतवाढ मिळावी अशी मागणी रिक्षाचालकांनी केली आहे. हे आंदोलन ठाणे जिल्हा वाहतूक सेनाध्यक्ष आशिष डोके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालक आणि मनसे पदाधिकारी उपस्थित होते.