ठाणे - आज ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच वर्तमान पत्रात छापून आल्याने विरोधी पक्षांनी प्रशासन आणि आयुक्त यांना चांगलेच धारेवर धरले. काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी सभागृहात गोंधळ घालत सभात्याग केला. तर, मनसेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी महापालिका आयुक्तांची पालिका मुख्यालयात भेट घेत याबाबत जाब विचारला. तर, यावेळी अविनाश जाधव यांनी आजपर्यंत सर्वात भित्रा आयुक्त म्हणून आयुक्तांवर ताशेरे ओढले.
हेही वाचा - मुंब्रामधील विद्यार्थिनी हिजाब परिधान करून करतायेत फुटबॉलचा सराव; देशाचे नाव उज्वल करण्याला महत्त्व
आज ठाणे महानगरपालिकेचा कोणतीही करवाढ अथवा दरवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र हा अर्थसंकल्प चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच तो वर्तमानपत्रात छापून आल्याने विरोधी पक्षांनी प्रशासन आणि आयुक्तांवर तोफ डागली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आजपर्यंतचा सर्वात भित्रा आणि विश्वासाहर्ता गमावलेला आयुक्त अशी डॉ. विपिन शर्मा यांची निंदा केली.
आयुक्त नेत्यांच्या दबावाखाली येऊन काम करत असल्याची टीका जाधव यांनी केली. कोरोना काळात झालेला भ्रष्टाचार असो अथवा आता प्रभाग रचनेमध्ये झालेली चालबाजी ही कोणाच्या इशाऱ्यानुसार झाली आपल्याला माहीत असल्याचे त्यांनी सांगितले. आताच्या आयुक्तांची जनमानसातील प्रतिमा अत्यंत मलीन झाली असून, या सर्व भ्रष्टाचाराविरोधात आपण लवकरच रस्त्यावर उतरू, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला. या दरम्यान अविनाश जाधव यांनी पालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या दालनात जाऊन याबाबत जाब विचारत चांगलाच गोंधळ घातला.
ठामपा आयुक्तांची विश्वासार्हता संपली
ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प फुटल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली थेट ठामपा आयुक्तांच्या दालनात धडक मारून जाब विचारला. यावेळी अविनाश जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी केली. एकीकडे डॉ. विपिन शर्मा यांनी ठाणे महापालिकेचा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून घोटाळासत्र सुरू झाले आहे, तर दुसरीकडे अतिरिक्त आयुक्त गाण्याच्या कार्यक्रम करून चाटेगिरी करत असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी यावेळी केला. कोरोना काळात घोटाळा, प्रभाग रचना, अर्थसंकल्प फुटी प्रकरण यामध्ये आयुक्त जबाबदार असून, दबावाखाली काम करत आहेत. अर्थसंकल्पावर उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्याची विश्वासार्हता संपली असल्याचे यावेळी जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा - Murder of Brothers Wife : संपत्तीच्या वादातून दिराने केला भावजयीचा खून, आत्महत्येचा बनाव पडला उघडा