ठाणे : मनसेच्या वतीने मंगळवारी ठाणे महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. ठाणे महापालिकेत सत्तेत असलेला शिवसेना पक्ष आणि विरोधी पक्ष हे राज्यात एकत्रच सरकारमध्ये असल्याने ठाणेकरांची फसवणूक होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. गेली 25 वर्षे सत्तेत असूनही सत्ताधारी शिवसेनेने ठाण्यातील नागरिकांसाठी कोणतेही काम केले नसून ठाणेकरांच्या डोळ्यात केवळ धूळफेक करण्याचे काम केल्याची टीका यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली.
रस्ते,पाणी, घरे यासारखी अनेक आमिषे शिवसेनेने नागरिकांना दाखवली होती. परंतु त्यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नसल्याची टीका ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली. गेल्या पंचवीस वर्षात ठाण्याला स्वतःचे धरण नसल्याने ठाणेकरांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील रस्त्यांची दुरावस्था बघून पालकमंत्री यांनी आयुक्तांना सोबत दौरा केला होता व त्यात दोषी आढळल्याने चार अभियंत्यांना निलंबित करण्यात आले होते. परंतु केवळ 20 ते 22 दिवसात त्यांना पुन्हा रुजू करून घेण्यात आल्याची टीका त्यांनी केली.
रस्त्यांवरील खड्यांच्या प्रकरणात निर्दोष अभियंत्यांवर कारवाई झाली, परंतु दोषींवर कोणतीच कारवाई का झाली नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. क्लस्टर योजनेचे दोन वेळा उद्घाटन होऊनही अद्याप एकही घर खाली केले नसल्याची टीकाही त्यांनी केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाचशे स्क्वेअर फुटच्या वरील सदनिकांचा कर माफ करण्याची घोषणा केली होती. परंतु त्याचा लाभ ठाण्यातील एकाही घराला मिळाला नाही असा आरोप त्यांनी केला. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना पक्षाविरोधात जनजागृती करून येत्या 10 डिसेंबर रोजी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्याची घोषणा अविनाश जाधव यांनी केली. तर ठाणे महापालिकेत सत्तेत बसलेला शिवसेना पक्ष व विरोधी पक्ष हे राज्यात एकत्रच सरकार मध्ये असल्याने ठाणेकरांची फसवणूक होत असल्याचा आरोप मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केला. आश्वासने देऊनही ठाणेकरांना एकही सुविधा न दिल्याबद्दल आयुक्तांनी आणि सत्ताधारी शिवसेनेने ठाणेकर यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी रवींद्र मोरे यांनी केली.