मीरा भाईंदर (ठाणे) - शहरात भाडे करारामध्ये लागणारे मुद्रांक व नोंदणी शुल्क बुडवून शासनाची करोडो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मिरारोड उपशहर अध्यक्ष सचिन पोपळे यांनी केला आहे. भाडे करार करताना मुद्रांक व नोंदणी शुल्क न भरता खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची करोडो रुपयांची फसवणूक केली जात असल्याची कागदपत्रे पोपळे यांनी पुराव्यानिशी सादर केली. त्यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत बारकोड नसलेले दस्तावेज सादर केले. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ठाणे मुद्रांक जिल्हाधिकारी मनोज वावीकर व पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडे तक्रार करून फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोपळे यांनी केली आहे.
मिरा-भाईंदर शहरात एका नोंदणीकृत एजंटमार्फत महिन्याला किमान हजाराहून अधिक भाडे कराराचे मुद्रांक व नोंदणी शुल्क भरले जाते. या प्रकरणात मोठे रॅकेट सहभागी असल्याचा संशय पोपळे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान याबाबत संबंधितांवर कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. याप्रसंगी मीरा- भाईंदर शहराध्यक्ष हेमंत सावंत, मीरा -भाईंदर विधानसभा अध्यक्ष संदीप राणे उपस्थित होते.
हेही वाचा - '...अन् सुरक्षित घरी जा' बारमालकाने घेतली घरी सोडण्याची हमी
हेही वाचा - विनापरवाना पिस्तुल विक्री करणाऱ्यास वाशी पोलिसांकडून अटक