ठाणे - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशभर तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आला. त्यामुळे आता 17 मे पर्यंत देशात टाळेबंदी राहाणार आहे. मात्र, लॉकडाऊनच्या या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील स्थलांतरीत मजूरांचा धीर खचल्यासारखे दिसत आहे. त्यातच मुंबई, ठाणे परिसरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढही चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या परराज्यातील कामगारांनी आता जमेल तो पर्याय स्वीकारत गावाकडे परतण्याचे धोरण सुरु केले आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील पडघा या परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनांमध्ये हे मजूर जनावरांसारखे कोंबल्याचे दिसत आहेत. तर काहीवेळा गाडीच्या बाहेरही मजूर लटकून जात आहेत. अत्यंत धोकादायक असा हा प्रवास आहे. असे असूनही ट्रक, कंटेनर, टेम्पो वाहनांमध्ये दाटीवाटीने गर्दी करून हे मजूर आपल्या गावाकडे जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करत आहेत.
हेह वाचा... लॉकडाऊनमुळे असंघटीत क्षेत्रातील कामगारांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर- जागतिक कामगार संघटना
मागील आठ दिवसांपासून परराज्यात जाणाऱ्या कामगारांसाठी श्रमिक ट्रेन सोडण्यात येत आहेत. पोलिसांकडे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्यावर खासगी वाहनांना देखील प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. तसेच अनेक पर्यायांची चाचपणी सुरु असून स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तरिही काही मजूर मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर अनेक ट्रक, कंटेनर, टेम्पो, रिक्षा तर काही जण सायकलवरून आपापल्या गावी जात आहेत.