ठाणे - शहरात वाढत्या वीज बिलाच्याबाबतीत लाखो तक्रारी महावितरणकडे येत आहेत. तीन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने घरोघरी जाऊन मीटर रीडिंग घेण्यात आले नाही. याऐवजी मागील महिन्यांची सरासरी बिल ग्राहकांना देण्यात आले. येथून पुढे कोणाचाही वीज पुरवठा खंडीत केल्यास महावितरण कार्यालयाचीच वीज कापणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे.
काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा रक्कमेचे लाइट बील आले, तर अनेक ठिकाणी बील भरल्यानंतर देखील वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने नागरिक संतप्त आहेत. हे प्रकार वारंवार होत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
वितरणा संदर्भात कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यास तसेच वाढीव बिल मागे न घेतल्यास महावितरण कार्यालयाची वीज कापण्याची धमकी मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे. अनेकांची घरं बंद असून देखील त्यांना हजारांचे बिल देण्यात आले आहे. काही व्यापाऱ्यांची तीन महिने दुकाने बंद असून त्यांना देखील ज्यादाची बिले आली आहेत. अनेकांच्या थकबाकीत चुका दाखवण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार केल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी कोणत्याही नागरिकाची वीज सेवा खंडित केल्यास ऑफिस वीज पुरवठा खंडित करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.