ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी आजचा (बुधवारी) अल्टीमेटम दिलेला होता. त्यामुळे सगळीकडे तणावाचे वातावरण पसरले होते. अशा वेळी वाद वाढू नये म्हणून आपला एक प्रयत्न असावा यासाठी ठाण्यातील कापूरबावडी येथे असलेल्या जामा ( Jama Masjid at Kapurbawdi in Thane ) मशिदिवरील भोंगे ( Loudspeaker removed ) स्वतः मुस्लिम धार्मियांनीच उतरवले आहे. यामुळे मुस्लिम समाजाने एक चांगला आदर्श घालून दिला आहे. समाजाचा दबाव न बाळगता स्वतःहून केलेल्या या कृतीचा ठाणे पोलिसांनी ( Thane Police ) देखील सन्मान केला आहे.
जामा मशिदीच्या शेजारी अत्यंत जागृत असे आशापुरा मातेचे मंदिर आणि कापूरबावडी पोलीस स्थानक असल्याने येथे देखील काही धार्मिक तणाव होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु येथील मुस्लिम बांधवांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतःच मशिदिवरील भोंगे खाली उतरवले. भोंगे उतरविण्यासाठी आपल्यावर कोणताच राजकीय दबाव नव्हता व कोणत्याही दबावाला बळी न पडता आपण स्वच्छेने हे भोंगे खाली उतरविल्याचे येथील मुस्लिम बांधवांनी सांगितले. भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्याचे पालन करून रीतसर परवानगीसाठी भविष्यात पोलीस स्थानकात अर्ज करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. स्थानिक हिंदू धर्मियांनी देखील मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे स्वागत केले असून शेजारील आशापुरा मंदिर व्यवस्थापनाकडून पुष्पगुछ देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.