ठाणे - डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावरील कोपर उड्डाण पुलाच्या बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोपरच्या उड्डाणपूलाचे काम रखडल्याचा आरोप करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या तसेच नेटकऱ्यांच्या टीकेला उत्तर देणारे पत्रक कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी काढले आहे. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी डिसेंबर अखेरपर्यंत खुला करण्यात येणार असल्याचे कोळी-देवनपल्ली यांनी आश्वासन दिले आहे.
डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाणपूल मुंबई आयआयटीच्या अहवालानुसार धोकादायक झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरील सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी गेल्यावर्षी 15 सप्टेंबरपासून कोपर रेल्वे उड्डाणपूल बंद करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासन व महानगरपालिका यांच्या संयुक्त बैठकीत ठरल्यानुसार पुलावरील जुना डेक स्लॅब तोडून पुनर्बांधणी करण्याचे काम महानगरपालिकेने करावे लागणार आहे. तर पुलाचे खांब व प्लेट गर्डर दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाला करावे लागणार आहे. संबंधित अभिकरणाने 17 एप्रिलला ट्रॅकवरील जुना उड्डाण पूल तोडण्याचे काम सुरू केले आहे. हे तोडकाम 30 एप्रिलला पूर्ण करण्यात आले आहे.
रेल्वे सेवा बंद असल्याने कामाला वेग-
रेल्वे सेवा खंडित असलेल्या कालावधीत पुलाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे साधारण 3 महिने कालावधीचे काम केवळ 15 दिवसांच्या कालावधीत पूर्ण करणे शक्य झाले आहे. अस्तित्वात असलेल्या कोपर पुलावर महावितरणच्या एकूण 5 उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या असल्यामुळे पुनर्बांधणीचे काम रखडलेले होते.
महावितरणने 3 विद्युत वाहिन्या स्थलांतरित केल्या आहेत. इतर 2 विद्युतवाहिन्या नजिकच्या काळात स्थलांतरीत करण्याचे हमीपत्र दिल्यानंतर सद्यस्थितीत नवीन डेक स्लॅब बांधण्याचे रविवारी 18 ऑक्टोबरला पूर्ण झाले आहे. या उड्डाण पुलाच्या पूर्व बाजूकडील पोहोच रस्तादेखील कमकुवत झाला आहे. त्याच्याही पुनर्बांधणीचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण काम डिसेंबर अखेर पूर्ण करून हा उड्डाण पूल वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन असल्याचे शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी सांगितले.