ठाणे - सचिन अहिर यांच्या सेनाप्रवेशाने अनेक जणांनी भुवया उंचावल्यात. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हे वेदनादायक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
आव्हाड म्हणाले, 'माझे अनेक जवळचे मित्र, गेल्या अनेक वर्षांचे सहकारी आम्हाला सोडून दुसऱ्या पक्षात गेले. केवळ सत्ता हे सर्वस्व मानले, तर राजकारणात निष्ठा, स्वामीनिष्ठा, नाते आणि विश्वास या गोष्टींना काहीच अर्थ राहत नाही. ज्या सचिन अहिर यांना शरद पवार साहेबांनी लहानपणासून आधार दिला, विविध पदं दिली, सतत लाल दिवा दिला, ते सचिन अहिर असं करतील हे मला कधीही वाटलं नव्हतं.'
'कालपर्यंत जे गांधींची पूजा करायचे, त्यांच्यापुढं नतमस्तक व्हायचे, ते आता नथुरामसमोर नतमस्तक होतील. हे पाहून गांधीजींनाही लाज वाटेल, की मी कशाला गोळ्या झेलल्या यांच्यासाठी?' अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपले मत व्यक्त केले.
'आज वयाच्या ८० व्या वर्षी साहेबांना हे पहावं लागतंय, ते जर साठीचे असते तर त्यांनी पुन्हा एक झंजावात उभा करुन या सर्वांना आडवे पाडले असते. ते शरद पवार आहेत. त्यांच्याकडे अद्भुत शक्ती आहे. ते काय करतील हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र, शरद पवारांनाही हृदय आहे, आणि अशा घटनांनी त्यांच्या हृदयाचे काय तुकडे होत असतील याचा विचार सचिन अहिरांनी केला का,' असा भावनिक प्रश्न आव्हाड यांनी मांडला.