ठाणे - मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळे परिवहन महामंडळाला हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. मात्र आता संपावर गेलेले कर्मचारी कामावर आल्याने ऐन सिजनमध्ये प्रवाशांची रिघ एसटीकडे लागली आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाचे उत्पन्नही वाढले आहे.
बससेवा सुरू झाल्यामुळे उत्पन्न वाढले - राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील संपात सहभागी झालेले २७८५ कर्मचाऱ्यांपैकी २७३९ कर्मचारी हजर झालेले आहेत. संप काळात आतापर्यंत राज्य परिवहन विभागाचे ठाणे विभागात प्रतिदिन ६०,००० किमीपर्यंत बस चालवल्या जात होत्या. त्यातून उत्पन्न सरासरी २५ लाखापर्यंत प्राप्त होत होते. मात्र कर्मचारी हजर झाल्याने सेवा वाढल्या. ठाणे विभागाकडून १ लाख ४६ हजार किलोमीटरची सेवा सुरू असून त्यातून ४४ लाखापर्यंत उत्पन्न मिळाले आहे. त्यासोबत प्रतिदिन ७९,००० प्रवाशी वाहतूक एवढी वाढ देखील झाल्याचे चित्र समोर आले आहे.
कर्मचारी कामावर आल्याने प्रवाशी समाधानी - मागील 6 महिन्यांच्या संप काळात प्रवाशी, विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिकांची सेवा बंद असल्यामुळे हाल सुरू होते. त्यांना फक्त खासगी सेवेचा आधार होता. मात्र ही खासगी सेवा महागडी आणि बेभरोशाची होती. ही सेवा सुरू झाल्याने प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले असून यामुळे अनेकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत देखील होणार आहे.
हजारो लोकांना नोकरीचा आधार सुरू झाला - एसटी प्रशासनाच्या सेवेमुळे अनेक व्यावसायिक या सेवेवर अवलंबून आपला व्यवसाय करत होते. संप सुरू झाल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. मात्र आता आपला व्यवसाय एसटी सेवा सुरू झाल्याने अनेक कुटुंबांना आपला चरितार्थ सांभाळता येणार आहे.