ठाणे - ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाला यंदा वाहन खरेदी आणि नोंदणी प्रक्रियेत कमालीचा महसूल मिळाला आहे. कोरोनाचे संकट असतानाही ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची खरेदी केली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची नोंदणी करण्यात आल्याने, तब्बल सव्वा कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
कोरोनाच्या काळात प्रादेशिक परिवहन कार्यालयात जवळपास शून्य वाहन खरेदी आणि नोंदणी झाली होती. मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर यंदा मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी झाली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या दोन दिवसांमध्ये तब्बल 101 चारचाकींची तर 700 दुचाकींची नोंदणी झाली. या दोन दिवसांत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला तब्बल सव्वा कोटींचा महसूल मिळाला आहे.
रेल्वे, बसचा प्रवास टाळण्यासाठी दुचाकींची खरेदी
अजुनही कोरोनाचे संकट कमी झालेले नाही. मात्र राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने हळहळू सर्व संस्था सुरू होत आहेत. त्यामुळे नोकरदार वर्गाला नोकरीसाठी घराबाहेर पडावे लागते. अशात जर रेल्वे किंवा बसने प्रवास केल्यास गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. म्हणून गर्दी टाळण्यासाठी यंदा ठाणेकर दुचाकी गाड्यांना प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच ठाण्यात विक्रमी वाहन विक्री झाली आहे.