ठाणे - डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या डायघर गावात एका 29 वर्षीय विवाहितेचा पतीनेच खून केल्याची घटना रविवारी घडली होती. आराफा शाह मोहम्मद खान असे मृत विवाहितेचे नाव आहे. आरोपी पती शान खान उर्फ बाबू हा फरार झाला होता. दरम्यान आरोपी परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यास डायघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शरीरसंबंधास नकार दिला म्हणून आपण पत्नीचा खून केल्याचा कबुली जबाब आरोपीने दिला आहे. या घटनेत मृत महिलेचा दोन वर्षांचा चिमुकला मात्र आता आई-वडिलांना मुकला आहे.
डायघर गाव येथील माऊली अपार्टमेंटमध्ये एका विवाहितेचा खून झाल्याची माहिती डायघर पोलिसांना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मिळाली. खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी आराफा शाह मोहम्मद खान ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. महिलेचा खून तिचाच पती बाबू उर्फ शान खान याने केल्याचे तपासातून समोर आले. सदर आरोपी फरार झाला होता. तो उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यास डायघर पोलिसांनी दादर स्थानकावरून ताब्यात घेतले.

आरोपीकडे अधिक विचारपूस केली असता त्याने महिलेच्या हत्येची कबुली दिली. शरीरसंबंधास नकार दिल्यामुळे रागाच्या भरात आपण पत्नीच्या डोक्यावर चिनीमातीच्या पोळपाटाने प्रहार केला आणि नंतर तिचे डोके उंबरठ्यावर आपटून तिची हत्या केली असा जबाब आरोपीने दिला आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने घराला बाहेरून कढी लावली आणि तो पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी मोबाईल लोकेशनची पडताळणी करून त्याचे लोकेशन हेरले. त्यानंतर डायघर पोलिसांचे एक पथक दादर रेल्वे स्थानकावर गेले. तेथे पोलिसांना बघताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यास मोठ्या शिताफीने अटक केली. दरम्यान, मृत महिला आराफा हिला दोन वर्षांचा मुलगा असून आईविना तो निराधार झाला आहे.
मृतदेहाजवळ रडून झोपला चिमुकला -
हत्या झाल्यानंतर पीडितेचा मुलगा रडून रडून आईला हाक मारत झोपला. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह असतानाही तशाच अवस्थेत आईला बिलगून झोपलेल्या बाळाला पाहून तपास करणाऱ्या पोलिसांना देखील आपल्या भावना आवरल्या नाहीत.