ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील १३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे ( Gram Panchayat elections ) मतदान शांततेत पार पडले. केंद्रावर मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या ( Voters lined up to vote ) होत्या. सायंकाळी मतदानाची वेळ संपेपर्यत ८० टक्केच्यावर मतदान झाले. यामुळे भाजपाच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांसह दोन्ही शिवसेना गटातील बड्या नेत्यांनी आमच्याच पक्षाचे सर्वाधिक सरपंचासह सदस्य निवडणून येणार असल्याचा दावा केला. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीचा गुलाल कोण उधळणार ? हे मतमोजणीच्या निकालानंतरच समोर येणार आहे. यामुळे कोणाचे दावे खरे ठरतात हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
चारही राजकीय पक्षाचे सरपंच बिनविरोध : विशेष म्हणजे ठाकरे गट व शिंदे गटातील सत्ता संघर्षानंतर जिल्ह्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १५८ पैकी ३१ सरपंच बिनविरोध निवडणून आले आहेत. यामध्ये ठाकरे गट, शिंदे गटासह राष्ट्रवादी आणि भाजप या चारही राजकीय पक्षाचे सरपंच बिनविरोध निवडून आले. शिवाय १ हजार ४५३ सदस्यापैकी ४८७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहे. तर उर्वरित ११९ थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार मैदानात असल्याने निवडणूक रंगतदार ठरली आहे.
कोण बाजी मारणार हे निकालानंतर येणार समोर : जिल्ह्यातील तीन तालुक्यात प्रामख्याने ग्रामपंचायत निवडणुका गाजणार आहे. यापैकी सर्वाधिक शहापूर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायती त्या खालोखाल मुरबाड तालुक्यातील ३५ ग्रामपंचायती तर भिवंडी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. यापैकी भिवंडी ३ शहापूर १३ तर मुरबाड मध्ये १० सरपंच बिनविरोध निवडणून आले आहे. त्यामुळे भिवंडीत २८ शहापूरमध्ये ६६ आणि मुरबाडमध्ये २५ ग्रामपंचात निवडणुकीत कोण बाजी मारणार हे निकालानंतर समोर येणार आहे.
पाच ग्रामपंचायत निवडणुकीत बहिष्कार : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ७९, कल्याण ७, अंबरनाथ १, ठाणे ५, भिवंडी ३१, मुरबाड ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आला. यापैकी जिल्ह्यात १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर ठाणे तालुक्यातील पाच ग्रामपंचायत निवडणुकीत बहिष्कार होता. तर २० ग्रामपंचायतीमधून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने या ठिकाणी निवडणुका झाल्या नाहीत. जिल्ह्यातील १३४ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदानाचा सायंकाळपर्यँतची टक्केवारी पाहता सर्वधिक मतदान कल्याण तालुक्यातील ७ ग्रामपंचायतचीमध्ये झाले. जिल्ह्यातील ४५९ मतदान केंद्रवर मतदान प्रकिया सुरळीतपणे पार पडली असून जिल्ह्याभरातील ८५५ सदस्य व ११९ थेट सरपंच पदासाठी नशीब अजमावणाऱ्या उमेदवाराचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे.
केंद्रीय राज्यमंत्र्यांचे भाकीत, तर दोन्ही शिवसेना गटाचाही दावा : केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भाकीत केले कि, उद्याच्या निकालानंतर भाजपचे शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यातून ७० ते ८० ग्रामपंचायती भाजपचे उमेदवार निवडणून येतील. शिवाय दोन्ही ठाकरे गटाकडे वेगळे लढत असल्याने त्याचा फायदा भाजपला होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर शिंदे गटाचे उपनेते प्रकाश पाटील यांनाही सार्वधिक ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकणार असून मुख्यमंत्री पालकमंत्री असताना केलेल्या जिल्ह्यातील गावागावाचा विकास यामुळे आम्हीच बाजी मारणार असल्याचे सांगितले. शिवाय भाजपा आणि शिंदे गटात मैत्रीपूर्ण काही ठिकाणी लढती झाल्याचे मान्य केले. तर ठाकरे गटाचे भिवंडी लोकसभा संर्पक प्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनीही उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सर्वाधिक सरपंच आणि सदस्य निवडून आल्याचे दिसेल. शिवाय माजी आमदार म्हात्रे यांनी भाजपा व शिंदे गट आपसात संगनमत करून आमिष दाखवत उद्धव ठाकरे गटातील सरपंच व सदस्यांवर दबाव टाकून खेचून घेण्याचा प्रयत्न करीत असा आरोप करत शिंदे गटासह भाजपावर निशाणा साधला. एकंदरीतच कोणत्या पक्षाच्या पारड्यात मतदारांनी मताचे दान टाकल्याचे उद्याच्या मतमोजणीनंतरच समोर येणार आहे.